सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या समाजकार्य विभाग, सोलापूरचे माजी विद्यार्थी, सोलापूरचे सुपुत्र अंबादास यादव यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयात (MIB) निवड करण्यात आली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयातील भारतीय माहिती सेवेत (IIS) सिनिअर ग्रेड गॅझेटेड ऑफिसर पदाकरिता मराठी भाषेसाठी अंबादास यादव यांची निवड करण्यात आली.
या पदासाठीच्या मुलाखती जुलै महिन्यात दिल्ली येथील UPSC भवन येथे घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल मंगळवार (१५ जुलै) रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आला आहे. अंबादास यादव हे क्षेत्रीय प्रचार सहायक म्हणून केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय, अमरावती, नागपूर, जळगाव आणि सध्या सोलापूर येथील केंद्रिय संचार ब्यूरो (CBC) मध्ये कार्यरत आहेत.
अंबादास यादव हे समाजकार्यातून पदव्युत्तर आहेत. राष्ट्रीय प्राध्यापक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण असून समाजकार्य पदव्युत्तर मध्ये सोलापूर विद्यापीठातून ते दुसरे असून त्यांनी कांस्य पदक पटकावले आहे. यादव यांचे पत्रकारितेचं शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संलग्न श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथे झाले आहे तसेच महाविद्यालयीन शिक्षण वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय, समाजकार्य विभाग सोलापूर येथे आणि शालेय शिक्षण यशोधरा प्रशाला, सोलापूर येथून पूर्ण झाले आहे.
अतिशय बिकट परिस्थितीवर मात करत अंबादास यादव यांनी मिळवलेल्या या यशाचे सोलापुरात सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, जिल्हा माध्यम अधिकारी रफीक शेख, प्रदीप वाला, एनएलएमयु चे जिल्हा व्यवस्थापक समीर मुलाणी, महा एनजीओ फेडरेशन चे संचालक अमोल उंबरजे, उद्योजक विरेश नसले, निवृत्त अधिकारी सतीश घोडके, सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव, जलसंपदा विभागाचे आनंद कटाप, कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, मित्रपरिवार रितेश झुंजारे जयराम गड्डम, मनोज पवार, राघवेंद्र कोडमुर, स्वप्निल किनगी, महेश गाढवे, मनीष हुल्ले आणि सिद्धू बिराजदार आणि जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी यांनी अभिनंदन केले.