म्हसवड प्रतिनिधी तेज न्यूज
दीर्घ पाठपुरावा आणि लोकहितासाठी अखंड प्रयत्न करणारे इंजि. सुनील पोरे यांच्या पुढाकाराला अखेर यश मिळाले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये दिल्ली येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, म्हसवड परिसरातील जनतेसाठी अत्यंत महत्वाचा असलेला सातारा-पंढरपूर मार्ग तत्काळ पूर्ण करावा, यासाठी इंजि. पोरे यांनी आमरण उपोषण केले होते. त्यानंतर या रस्त्याचे मुख्य काम मार्गी लागले, मात्र काही ठिकाणी अपूर्ण असलेली पूल व मोऱ्यांची कामे न संपल्याने नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
या गंभीर बाबीकडे एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे परिस्थितीचा गांभीर्य ओळखून, ३१ मे रोजी नागपूर येथे पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, अपूर्ण असलेल्या पुल व मोऱ्यांची कामे तत्काळ पूर्ण करण्याची ठाम मागणी इंजि. सुनील पोरे व त्यांच्या शिष्टमंडळाने केली. यावर मंत्री गडकरी यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना काम तातडीने पूर्ण करण्याचे सक्त आदेश दिले.
त्याचाच परिणाम म्हणून आज म्हसवड , दिवड,धुळदेव, पिलीव,साळमुख, उपरी येथील अपूर्ण पुलांच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात झाली असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जनतेच्या आवाजाला न्याय मिळवून देणाऱ्या इंजि. सुनील पोरे यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले असल्याची भावना नागरिक व्यक्त करत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सातारा-पंढरपूर मार्ग परिसरातील प्रवाशांसाठी, शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी ही विकासाची महत्त्वाची पायरी ठरणार आहे, असा विश्वासही नागरिक व्यक्त करत आहेत.