पुणे प्रतिनिधी सागर बोदगिरे तेज न्यूज
शहराच्या पश्चिम भागातील औंध, बालेवाडी व खडकी या रहिवासी आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या परिसरांमध्ये गेल्या काही दिवसांत भरदिवसा होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनक प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरिकांच्या दागिन्यांची उघडपणे चोरी, घरे व व्यावसायिक स्थळांवर धाडसी चोऱ्या यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावत आहे. या घटनांना आळा घालावा आणि दोषींवर तत्काल कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात सनी निम्हण यांनी म्हटले आहे की, चोरी आणि लुटीच्या घटनांमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस यंत्रणेबाबतचा विश्वास डळमळीत होत चालला आहे. सार्वजनिक सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.
*या उपाययोजना करण्याची मागणी*
१. संवेदनशील ठिकाणी पोलीस गस्त व बंदोबस्तात वाढ करावी, विशेषतः चोरी होणाऱ्या भागांमध्ये दिवसाच्या वेळेतही नियमित पोलीस गस्तीस प्राधान्य द्यावे.
२. सीसीटीव्ही यंत्रणेची स्थिती तपासून निकृष्ट वा बंद अवस्थेतील उपकरणे दुरुस्त अथवा बदलण्यात यावीत, सार्वजनिक ठिकाणांवरील देखरेखीच्या व्यवस्थेचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करावा.
३. स्थानीय रहिवाशांशी समन्वय साधण्यासाठी 'मोहल्ला कमिटी' व 'बीट पोलिसिंग' उपक्रम अधिक सक्रिय व प्रभावीपणे राबवावे, नागरिकांच्या सहभागातून स्थानिक पातळीवर गुन्हेगारी रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करावा.
४. चोरीच्या घटनांची सखोल तपासणी करून दोषींवर कठोर व त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारे झालेल्या घटनांचे लवकरात लवकर उकल होणे आवश्यक आहे.
५. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी नियमित संवाद बैठकांचे आयोजन करावे, पोलिसांनी समुदायाशी थेट संवाद साधल्यास भीती दूर होऊन जनतेचा सहभाग वाढेल.
वरील गोष्टींची तात्काळ अंमलबजावणी केल्यास परिसरातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित होईल आणि नागरिकांचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास पुनः दृढ होईल, अशी आम्हांस खात्री वाटते. आपल्याकडून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी अपेक्षा सनी विनायक निम्हण यांनी व्यक्त केली आहे.