अत्यंत साधेपणाने पार पडला सोहळा
मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हाॅलमध्ये पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते.
सुनेत्रा पवार या शुक्रवारी रात्रीच बारामतीतून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. आज सकाळपासून मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळाले होते. सुनेत्रा पवारयांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादीची गटनेतेपदाची महत्त्वपूर्ण बैठक विधीमंडळात पार पडली. यावेळी दिलीप वळसे पाटलांकडून गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. छगन भुजबळ यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आले. यानंतर सुनेत्रा पवार यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, संजय बनसोडे, सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर रवाना झाले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गटनेते म्हणून सुनित्रा पवार यांची निवड झाल्याचे पत्र दिले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ते पत्र राज्यपालांना पाठवण्यात आले.
सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
त्यानुसार, शपथविधी सोहळा संध्याकाळी 5 वाजता पार पडला. मर्यादित लोकांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. शपथविधी सोहळा अवघ्या 10 मिनिटांत अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
शपथविधीनंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकडे रवाना
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचा दहावा होईपर्यंत त्या बारामतीतच मुक्काम करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, दुखवटा संपेपर्यंत त्या नेते व कार्यकर्त्यांची भेट घेणार असल्या तरी, या काळात कोणतेही हार, तुरा किंवा सत्कार स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शोकाकुल वातावरणात साधेपणा आणि संवेदनशीलता जपण्यावर त्यांचा भर असणार आहे.
सुनेत्रा पवार यांचा परिचय
सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी तेर (जि. धाराशिव) याठिकाणी झाला. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची बहीण असलेल्या सुनेत्रा पवार यांना राजकीय वारसा जन्मतःच लाभलेला होता. १९८५ मध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्यासोबत झाला. लग्नानंतर काटेवाडी (ता. बारामती) येथे आल्यावर त्यांनी सामाजिक कार्याला सुरूवात केली. काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. अगदी पहाटे पासून स्वतः हातात खराटा घेऊन कामाला सुरुवात करणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण गावालाच या अभियानात सहभागी केलं. त्यांच्या या प्रेरणेतून ग्रामस्वच्छता अभियानात काटेवाडी राज्यात प्रथम क्रमांकावर आलं. या कार्याची दखल घेत देश-विदेशातून अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली. याच कामामुळं सुनेत्रा पवार यांना सार्क देशांच्या साकोसान परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सामाजिक कार्याला सुरूवात झाली.
बारामतीमध्ये 'एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया'च्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण, महिलांमध्ये कर्करोगाविषयी जागृती आदी उपक्रम सुनेत्रा पवारांनी राबवले. या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय आणि नेतृत्वात्मक सहभाग राहिला. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगार मिळवून दिला.
घरापासून राजकारणापर्यंत अजित पवारांना दिली साथ
लग्नानंतर अजित पवार यांच्यासोबत शेतकाम, पोल्ट्री व्यवसाय ते गाईगुरे सांभाळणे, दूध काढणे अशी सर्व कामं सुनेत्रा पवार यांनी आवडीने केली. अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीत आपली घरं सांभाळणे, नातेसंबंध जपणं, सामाजिक कार्य करणं, कठीणप्रसंगी दादांना साथ देणं आणि सल्लामसलत करणं, ही जबाबदारी त्यांनी पार पडली. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर आज पहिली महिला उपमुख्यमंत्री असा एक मोठा विक्रम होणार आहे. या आधी कोणत्याही महिलेने या पदावर काम केलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा प्रत्यक्षामध्ये राजकारणात प्रवेश झाला. त्यापूर्वी पवार कुटुंबातील प्रत्येक निवडणुकीवेळा त्या उत्साहाने प्रचारात उतरत असत आणि बारामतीमध्ये आत्तापर्यंत मिळालेल्या अनेक विक्रमी विजयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. पक्षफुटीनंतर सुप्रिया सुळेंविरोधात त्या लोकसभा निवडणुकीत उतरल्या आणि त्यांना पराभव पत्करावा लागला, यानंतरही त्या खचल्या नाहीत.
त्या जनसेवेत सक्रिय राहिल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांना तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्ष आसनावर विराजमान होण्याचा मान मिळाला. आता अजित पवारांच्या निधनानंतर त्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

