* श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शन पाच तासात झाल्याने भाविकांकडून जिल्हाधिकाऱ्यांचे आभार
*इंडियन एअर फोर्स मध्ये सेवा बजावलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्याकडून आषाढी वारी 2025 मध्ये भाविक, वारकरी यांच्यासाठी देण्यात
आलेल्या सुविधा खूप उत्कृष्ट असल्याचे कौतुक...
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी शुद्ध एकादशी 6 जुलै 2025 रोजी असून, श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांनी पंढरपुरात मोठी गर्दी केली आहे. आज सकाळ पासूनच दर्शन रांग जवळपास गोपाळपूर जवळ पोहोचली आहे. भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर श्री विठ्ठल रूक्मिणीचे व्हिआयपी दर्शनाबाबत आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत तसेच राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश दिले आहेत. सदर आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का नाही याची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज दर्शन रांग व पत्राशेड येथे केली. तसेच दर्शन रांगेतील भाविकांशी यावेळी संवाद साधला.
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी किमान 15 ते 16 तास यापूर्वी लागत होते तर यावर्षी फक्त पाच ते सहा तासात आपले दर्शन झालेले आहे. तसेच मंदिर परिसर व संपूर्ण पंढरपूर शहरात भाविक वारकरी यांच्यासाठी खूप चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत, याबद्दल त्या भाविकांने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे मोठ्या उत्साहाने व आनंदाने आभार व्यक्त केले. हे भाविक व त्यांच्या समवेत असलेले इतर भाविक हे खूप कमी वेळात दर्शन झाल्याबद्दल आनंदी व समाधानी होते. यावेळी त्यांच्यासमवेत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री उपस्थित होते.
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणावर भावीक येत आहेत. शासनाने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वारकरी भाविकांसाठी पालखी मार्ग व पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणावर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सर्व सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पंढरपूर शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन घेत असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरात इंडियन एअर फोर्स मध्ये पंधरा वर्षे सेवा बजावलेले व पंढरपूर येथे अनेक वर्षापासून वारी कालावधीत दर्शनासाठी येत असणाऱ्या एका भाविकांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्री विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन बंद करून त्याची कार्यक्षमपणे अंमलबजावणी केलेली आहे. त्यामुळे दर्शन रांगेत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी कमी वेळ लागत असल्याचे अनेक दर्शन घेऊन आलेल्या भाविकांकडून सांगितले जात आहेत.भाविक वारकरी यांची कोणत्याही प्रकारची गैर सोय होऊ नये यासाठीच शासन, प्रशासन सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत आहे. व भाविकांच्या चेहऱ्यावर येथील सर्व सोयीसुविधा पाहून तसेच दर्शन वेळेत होऊन समाधानाचे भाव उमटावेत यासाठीच प्रशासन कटिबद्ध आहे.