पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला महुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना जास्तीतजास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. दिनांक 27 जून रोजी श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इ. राजोपचार बंद होऊन नित्यपुजा, महानैवेद्य व गंधादक्षा हे राजोपचार सुरू होते. सदरचे राजोपचार पूर्ववत करण्यासाठी चांगला महुर्त व दिवस पाहून दिनांक 16 जुलै रोजी श्रींची विधिवत प्रक्षाळपुजा करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
प्रक्षाळपुजेनिमित्त दिनांक 16 जुलै रोजी श्रींच्या दर्शन वेळेत बदल होणार असून, पहाटे 5.00 ते दु.12.20, दु.12.30 ते 2.10, दु.5.30 ते 6.45, रा.7.10 ते 11.30 या वेळेत दर्शन सुरू राहील तसेच दु.12.20 ते 12.30, दु.2.10 ते 5.30, सायं.6.45 ते 7.10 या वेळेत श्रीस पहिले स्नान, महाअभिषेक, अलंकार, महानैवेद्य व धुपारती निमित्त पदस्पर्शदर्शन बंद राहणार आहे. तथापि, श्रींचे मुखदर्शन नेहमीप्रमाणे सुरू राहील.
श्री.विठ्ठलाकडे 11 ब्रम्हवृदांकडून श्रीस रूद्राचा अभिषेक व श्री.रूक्मिणीमातेस 11 ब्रम्हवृंदाकडून पवमान अभिषेक केला जाणार असून, श्रींची प्रक्षाळपुजा मंदिर समिती सदस्य महोदयांच्या शुभहस्ते होणार आहे.