मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
चारकोप, कांदिवली (प.) मुंबई येथे शिंपी समाज हितवर्धक कांदिवली-बोरिवली प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांचा ६७५ वा संजीवन समाधी दिन सोहळा अत्यंत भक्तिभावात वातावरणात आणि प्रचंड उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात पालखी यात्रा, भक्तिगीत आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी झाली. प्रवीण सोनवणे व त्यांच्या मातापित्यांच्या सुमधुर भावगीत गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. महिला गायिका कविता पतंगे व हर्षदा पुणेकर यांनी अप्रतिम भजन गाणी सादर केले, तर रुपाली पोरे यांच्या शीळ वादन व सारिका बाविस्कर यांच्या हलक्याफुलक्या मिमिक्रीने कार्यक्रमात हास्याचा चुरचुरीत बाज आला.
संस्थेचे सचिव संजय कापडणीस यांच्या शब्द-शिल्पांनी नटलेल्या प्रभावी सूत्रसंचालनाने कार्यक्रमात उत्तम सुसंवाद साधला. प्रमुख पाहुण्यांमध्ये स्थानिक माजी नगरसेविका संध्या दोशी, दिगंबर सोनवणे, अनिल शिंपी, डॉ राजन पोरे, नरेंद्र बगाडे, गणेश हिरवे व इतर मान्यवरांनी समाजहितासाठी प्रेरणादायी विचार मांडले. संस्थापक विश्वस्त प्रभाकर निकुंभ यांनी उत्स्फूर्त मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष खिमजीभाई पटाडिया यांनी समाजातील सर्व उपवर्गांना अधिक बळकट व प्रतिष्ठित होण्यासाठी एकतेचा व समावेशकतेचा संदेश देऊन प्रेरित केले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करत त्यांच्या यशाचे गौरवपूर्वक कौतुक करून त्यांचे मनोबल उंचावण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
निवृत्त पोलीस कमिशनर विजय सोनवणे यांनी त्यांच्या दुर्लभ तिकिटांच्या संग्रहाचे आकर्षक प्रदर्शन सादर करून छंद जोपासण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.समारोपाला सोनवणे सरांच्या सुरेल वाणीतील पसायदानाने वातावरण अधिकच पावन झाले.
ह्या भक्तिमय कार्यक्रमाची सांगता सुग्रास स्नेहभोजनाने झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कापडणीस,मुकेश इसई, राजेश वारुळे, जितेंद्र बाविस्कर, गोविंद भामरे, विनय गवादे, निलेश सोनवणे, राजू जगताप, विनय सोनवणे,प्रवीण सोनवणे आदी मान्यवरांनी खूप मेहनत घेतली.महिला वर्गाचा सहभाग खूपच उस्फुर्त होता.