पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आषाढी वारी २०२५ ही नेटके नियोजन करून व नवनवीन संकल्पना राबवून यशस्वीरीतया पार पाडली आहे. त्यामध्ये पोलीस अधीक्षकांनी पालखी सोहळा व आषाढी यात्रेदिवशी भावीकांचे सोन्याचे दागिणे, मोबाईल व रोख रक्कम चोरी होत असल्याने त्यावर प्रतिबंध करण्यासाठी यावर्षी "माऊली स्कॉड" ही संकल्पना रावबली आहे.
त्यामध्ये प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जगताप, पोलीस निरीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण येथील ४ अधिकारी व ४१ अंमलदार व पंढरपूर शहर पोलीस ठाणेकडील १ पोलीस अधिकारी व १३ अंमलदार यांचे माऊली स्कॉड तयार केले. एका स्कॉडमध्ये १ पोलीस अधिकारी व ५ ते ७ पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले. त्यांना वारकरी परीधान करतात असा पोषाख पायजमा, कुर्ता, टोपी व गळ्यात वारकरी पंचा असा पोषाख परीधान करण्याबाबत सुचीत करण्यात आले होते.
या माऊली पथकांनी श्री. ज्ञानेश्वर महाराज व श्री. तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वीच महाराष्ट्रामध्ये गर्दीमध्ये चैन तोडणारे, मंगळसुत्र चोरणारे, खिसे कापणारे व मौल्यवान वस्तू चोरणारे अभिलेखावरील गुन्हेगार यांचे नाव, पत्ता व फोटो अशी माहिती प्राप्त केली होती. सदरची माहिती ही डिजीटल स्वरूपात अभिलेख तयार करून ती माहिती या पथकास पुरविण्यात आली होती. तसेच पालखी व पंढरपूर येथील बंदोबस्ताचे ब्रीफींगच्या वेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना फोटो व माहिती दाखविण्यात येवून ती माहिती प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये देण्यात आली होती.
माऊलीपथकाने दिनांक ३०.०६.२०२५ रोजी श्री. ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी धरमपुरी येथे व दि.०१.०७.२०२५ रोजी श्री. तुकाराम महाराज यांची अकलूज येथे प्रवेश केल्यानंतर पालखी जवळ दर्शन घेण्याच्या ठिकाणी, विसावा व मुक्कामाचे वारकरी पोषाखात लक्ष ठेवून होते. त्यावेळी चोरी करणारे लोक चोरी करताना पथकाचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना तात्काळ मुद्देमालासह ताब्यात घेवून त्यांच्यावर जवळच्या पोलीस ठाणेस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करून त्याचा पंचनामा करून तो मुद्देमाल लागलीच फिर्यादी यांचेकडून सुपर्वनामा लिहून घेवून जागीच परत करण्यात येत होता. अशा प्रकारे १५६ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले होते.
आषाढी वारी कालावधीत एकूण १८ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये २१ आरोपींना अटक करण्यात येवून १६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांचेकडून सुमारे २०० ग्रॅम सोन्याचे दागिणे त्यामध्ये सोन्याची चैन, मुगळसुत्र, अंगठी व इतर दागिणे असा एकूण १७,९९,८००/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. उर्वरीत संशयीत इसमांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी ही अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली माऊली पथकाकचे प्रथक प्रमुख सपोनि विशाल वायकर, सपोनि नागनाथ खुणे, सपोनि विजय शिंदे, सपोनि आशिष कांबळे व पोउपनि सुरज निंबाळकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व पंढरपूर शहर पोलीस ठाणेकडील तपास पथकातील ५४ पोलीस अंमलदार यांनी केली आहे.