पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेले वारकरी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्या अनुषंगाने स्वेरीचे विद्यार्थी भाविकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचे वाटप करून त्यांची तहान भागवीत आहेत. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सत्संग प्रमुख दादा वेदक, भाभा अणुसंशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ बालसुब्रमन्यम, स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे व मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या पाणी वाटपाच्या उपक्रमात श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिग्री), कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिप्लोमा), डी.फार्मसी व बी.फार्मसी या चारही महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी असे मिळून जवळपास १२५ जण सहभागी झाले आहेत.
राज्यात तंत्रशिक्षणातून विशेष ओळख निर्माण करणाऱ्या 'स्वेरी' संस्थेमार्फत, संस्थेच्या स्थापनेपासून अर्थात १९९८ पासून विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. परंपरेप्रमाणे दर्शन रांगेतील वारकऱ्यांना आर.ओ. फिल्टर्ड पिण्याचे पाणी वाटपाचे कार्य दि.३ जुलै पासून सुरु झाले आहे आणि दि. ७ जुलै पर्यंत चालणार आहे. वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिद्धी सिद्धी गणपती मंदिरालगत असणाऱ्या पत्राशेड मधील दर्शन मंडप रांगेतील वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी देवून या पाणी वाटपाच्या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. गोपाळपूर, रिध्दी-सिध्दी मंदिर व गोपाळपूर येथील दर्शन रांग, पत्रा शेड या ठिकाणी विद्यार्थी वारकऱ्यांना प्रचंड उत्साहाने २४ तास आर.ओ. फिल्टर्ड पाण्याचे वाटप मोठ्या उत्साहाने करत आहेत. विद्यार्थी ग्लास, वॉटर जग आणि वॉटर टॅंकद्वारे पाणी वारकऱ्यांपर्यंत पोहचवून वारकऱ्यांची तहान भागवत आहेत. स्वेरीकडून वारी काळात दररोज साधारण सोळा ते अठरा हजार लिटर पाण्याचे वाटप केले जात आहे. या उपक्रमाच्या उदघाटनावेळी दादा वेदक (केंद्रीय सत्संग प्रमुख, विश्व हिंदू परिषद) म्हणाले की, 'पाणी वाटपाच्या माध्यमातून स्वेरीचे विद्यार्थी हे उत्तम समाजकार्य करत आहेत’ असे म्हणून त्यांनी स्वेरीच्या समाजकार्याचे कौतुक केले.
स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस. मठपती, प्रा. ए.एस. भातलवंडे, प्रा. पी.एस. वलटे, रा. से. यो. चे समन्वयक प्रा. एन.ए.शिंदे, प्रा. अमोल चौंडे, डॉ.डी.एस. चौधरी, प्रा.आकाश पवार, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी वारकऱ्यांना पाणी वाटपाचे कार्य मनोभावे करत आहेत. कॉलेजमधून इतर सहकारी पाणी आणून दर्शन रांगेजवळ असलेल्या टाक्यात साठवतात. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने वारकऱ्यांना पाणी वाटप करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रत्येक दिवशी २० प्राध्यापक व जवळपास १०० विद्यार्थी मोफत शुद्ध पाणी वाटप करत आहेत.
या उदघाटन प्रसंगी केंद्रीय सत्संग प्रमुख, विश्व हिंदू परिषदेचे दादा वेदक, भाभा अणुसंशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ बालसुब्रमन्यम, बांधकाम व्यावसायिक क्षितिज वेदक, खेलो भारत कोकण प्रांतचे डॉ. स्वप्निल मडके, पुरंदरचे भाजप सरचिटणीस जयेंद्र निकम, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री गोपाळ सुरवसे आदी उपस्थित होते. प्रथम वर्ष इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.