आषाढी वारी 2025 अंतर्गत पालख्या व वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी केलेल्या खर्चाची देयके 8 दिवसात दिली जाणार
सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यातील आषाढी वारी नियोजनात असलेल्या सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार
आषाढी वारी 2025 आभार व कृतज्ञता मेळाव्यासाठी पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढ शुद्ध एकादशी 6 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मुख्य शासकीय महापूजा झाली. या वारीसाठी पंढरपूर येथे जवळपास 27 लाख भाविक उपस्थित होते. सर्व मानाच्या पालख्या दिंड्या व पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांसाठी तसेच पालखी मार्गावर सोलापूर पुणे व सातारा जिल्ह्यातील प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या. तिन्ही जिल्ह्यातील प्रशासनाच्या सुयोग्य नियोजन व परिश्रमामुळे यावर्षीची आषाढी वारी खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने पंढरपूर येथे आषाढी वारी 2025 आभार व कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नटराजन यांच्यासह पुणे सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री गोरे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर वारकरी भावी दिंड्या पालख्या त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण करण्यात आलेल्या होत्या. तसेच वाखरी व 65 एकर येथे तसेच मंदिर परिसर व संपूर्ण पंढरपूर शहरात प्रशासनाने वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही यासाठी सर्व कामे वारी पूर्वीच करून घेतलेली होती. तसेच दर्शनासाठी विविध सुविधा निर्माण केल्यामुळे दर्शनाचा कालावधी 16 व /17 तासावरून 5/6 तासापर्यंत आला त्यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर समाधान मिळाले व हे सर्व यश हे प्रशासनाने केलेल्या सुयोग्य नियोजनाचे व घेतलेल्या परिश्रमाचे असल्याचे त्यांनी सांगून सर्वाधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
आषाढी वारी कालावधीत वारकरी पालख्या तसेच भाविकांना सुविधा देण्यासाठी प्रशासनाने केलेल्या कामांची देयके पुढील आठ दिवसात दिली जाणार आहेत. यापूर्वी मागील आषाढी वारी संपली तरी दे एके दिली जात नव्हती परंतु आपण यावर्षी त्वरित देयके देणार असल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी यावेळी दिली.
यावेळी आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी आषाढी वारी 2025 मध्ये सर्व प्रशासनाने बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले व पुढील काळातही याच पद्धतीने वारीचे नियोजन होऊन वारकऱ्यांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध केल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा नटराजन तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी वारी कालावधीत केलेल्या कामकाजाची माहिती दिली. तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनीही पोलीस विभागाने वारीत बजावलेली भूमिका यावेळी सांगितली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते साफसफाई कर्मचारी यांना प्राथमिक स्वरूपात वारी कालावधीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. त्यानंतर ग्रामविकास विभागाचे मंत्रालयीन स्तरावरील अधिकारी यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात काही विभाग प्रमुखांच्या सत्कार व सन्मानचिन्ह पालकमंत्री यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
प्रारंभी पालकमंत्री गोरे व मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी आषाढी वारी 2025 आभार व कृतज्ञता मेळावा या कार्यक्रमाचे प्रस्तावित केले.