पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
परीट समाजासाठी सातत्याने कार्यरत असणारे आणि युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे गणेश ननवरे यांची महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या राज्य संघटक पदी निवड झाली आहे.
गणेश ननवरे हे माढा विधानसभेचे आमदार अभिजीत आबा पाटील यांचे निकटवर्ती सहकारी असून सध्या ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी याआधी पंढरपूर तालुका परीट धोबी सेवा मंडळाचे सरचिटणीस, तालुकाध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष या पदांवर कार्य करत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आरक्षणाच्या लढ्यातदेखील त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. परीट समाजासाठी स्थापन झालेल्या आरक्षण समन्वय समितीचे ते राज्यातील सर्वात तरुण सदस्य आहेत. समाजाच्या हक्कासाठी झालेल्या विविध आंदोलनांमध्ये त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांचा आवाज नेहमीच निर्णायक राहिला आहे.
राज्य संघटकपदी निवड झाल्यानंतर ननवरे यांनी सांगितले की, “गरीब परीट समाजाच्या आरक्षणासाठी व विविध मागण्यांसाठी मी संघर्ष करणार आहे. आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून महामंडळाच्या व समाजाच्या हक्काच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी झटणार आहे.”
गणेश ननवरे यांच्या या निवडीमुळे परीट समाजाच्या युवा पिढीला एक नवे नेतृत्व लाभले असून, राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या निवडीबद्दल माढा विधानसभेचे आमदार अभिजित आबा पाटील, प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलग, लॉन्ड्री अध्यक्ष गोविंद राऊत, महासचिव सुनील फंड, प्रदेश उपाध्यक्ष नामदेव वाघमारे, प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ननवरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजय सोनटक्के , विजय वाघमारे यांनी अभिनंदन केले.