वेळापूर प्रतिनिधी जयराम घाडगे तेज न्यूज
वेळापूर महादेव देवालय ट्रस्ट यांच्या वतीने भक्ती निवास येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही नागपंचमी सणानिमित्त भव्य सण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महिलांसाठी व मुलींसाठी खास स्पर्धांचे आयोजन करून सण साजरा करण्यात येणार आहे. सणोत्सवात महिलांचा सहभाग वाढावा आणि त्यांच्या कला-कौशल्याला वाव मिळावा या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांसाठी विशेष दहीहंडी स्पर्धा ही महोत्सवाची मुख्य आकर्षण ठरणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या पथकासाठी पैठणी साडीचे पहिले बक्षीस ठेवण्यात आले आहे. याशिवाय, सोमवार २८ जुलै रोजी सकाळी ११:०० ते दुपारी २:०० या वेळेत रांगोळी आणि मेहंदी स्पर्धा होणार आहेत. तसेच भक्ती निवास येथे महिलांसाठी, मुलींसाठी झोका खेळण्यासाठी ची सोय करण्यात आली आहे . रंगांची उधळण आणि सर्जनशीलतेचा मेळ घालणाऱ्या या स्पर्धांमध्ये महिलांची उत्स्फूर्त सहभागाची अपेक्षा आहे.
तसेच मंगळवार २९ जुलै रोजी दुपारी १:०० वाजल्यापासून संगीत खुर्ची, फॅन्सी ड्रेस, उखाणे स्पर्धा तसेच फनी गेम-१ आणि फनी गेम-२ अशा मनोरंजक स्पर्धांचे आयोजन केले आहे. या सर्व स्पर्धा महिलांच्या मनोरंजनासाठी तसेच त्यांची कलागुण सादर करण्यासाठी एक व्यासपीठ ठरणार आहेत.
महादेव देवालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराज माने देशमुख तसेच पांडुरंगभाऊ माने देशमुख यांनी पंचक्रोशीतील सर्व महिलांना आणि मुलींना या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, “महिलांचा आनंद, सहभाग आणि सृजनशीलतेमुळे नागपंचमीचा हा महोत्सव अधिक रंगतदार आणि संस्मरणीय ठरेल.”