पंढरपूर प्रतिनिधी शिवकुमार भावलेकर तेज न्यूज
भागवत धर्माची पताका संपूर्ण देशभर फडकविणारे श्री विठ्ठलाचे लडीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज व परिवार तसेच संत जनाबाई महाराज यांच्या षष्ठशतकोत्तर (675 व्या) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक उत्सवास गुरुवार दि. 10 जुलै, गुरुपौर्णिमेपासून प्रारंभ करण्यात आला असून श्रावण शु. 12, बुधवार दि. 6 ऑगस्टपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास यांनी दिली.
संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या संत नामदेव मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक उत्सवाला गुरुपौर्णिमे दिवशी संत पुजनाने प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा गोपाळपूर येथे गोपाळकाल्यासाठी निघाला. याठिकाणी काल्याचा अभंग झाल्यानंतर वारकरी, भाविकांना काल्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळा पुन्हा मंदिरात दाखल झाला.
यावर्षी संत शिरोमणी नामदेव महाराजांचा षष्ठशतकोत्तर (675 वा) संजीवन समाधी सोहळा संपूर्ण राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दि. 23 व दि. 24 जुलै रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्रीगण, महाराज मंडळी, देशभरातील शिंपी समाज बांधव व संत नामदेव महाराज भक्तमंडळी उपस्थित राहणार आहेत.
अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहाटे 5 वाजता काकड आरती, भजन, सकाळी 7 ते 10 वाजता संत नामदेव महाराज हस्तलिखित गाथा भजन, सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत किर्तन, दुपारी 3.30 ते 5 वाजेपर्यंत प्रवचन व नंतर हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत किर्तन व रात्री जागर असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मुख्य धार्मिक कार्यक्रमाच्या अंतर्गत आषाढ कृ. 11, सोमवार दि. 21 जुलै रोजी दिंडीची नगर प्रदक्षिणा, मंगळवार दि. 22 रोजी क्षिरापत, बुधवार दि. 23 जुलै रोजी संत नामदेव महाराज व संत सावता माळी यांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आधारित ह.भ.प. माधव महाराज नामदास यांचे किर्तन होणार आहे. पुष्पवृष्टी व आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या दिवशी संत नामदेव पायरी व संत नामदेव मंदिरावर हेलिकॅप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. गुरुवार दि. 24 रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता पालखी लवाजम्यासह गजारुढ दिंडीची नगर प्रदक्षिणा होणार आहे.
अखंड हरिनाम सप्ताहात मान्यवर ह.भ.प. महाराज मंडळींची कीर्तन व प्रवचन सेवा होणार आहे. तसेच श्रीमंत शितोळे सरकार, विठ्ठल स्वामी महाराज वडगावकर, रामानंद स्वामी नागपूरकर, बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार (आळंदी), मदन महाराज हरिदास, महेश मालक कवठेकर यांच्यासह मान्यवर ह.भ.प. महाराज मंडळी उपस्थित राहणार आहेत. सदर धार्मिक उत्सवासाठही श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेशवर, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, संत तुकाराम महाराज संस्थान देहू, संत एकनाथ महाराज संस्थान पैठण, संत सोपानदेव महाराज संस्थान सासवड, संत मुक्ताबाई महाराज संस्थान मुक्ताईनगर (जळगाव), श्रीराम दिंडी जळगांव, संत मुक्ताबाई महाराज संस्थान मेहुण, श्री सखाराम महाराज संस्थान, अंमळनेर, श्री नामदेव दरबार कमेटी घुमान (पंजाब), श्री उद्धव महाराज कुकुरमुंडेकर संस्थान, गुजरात, श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी, श्री समस्त वारकरी, फडकरी दिंडी समाज संघटना, वारकरी सांप्रदायिक पायिक संघ, विश्व वारकरी संघ, ह.भ.प. संत नामदेव महाराज क्षत्रिय एक संघ, महाराष्ट्र, वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र, संत नामदेव महाराज युवक संघ महाराष्ट्र, संत नामदेव शिंपी समाज व युवक संघटना, महिला मंडळ, पंढरपूर, जयराम स्वामी महाराज वडगांवकर मठ, पंढरपूर, केशवराज संस्था, पंढरपूर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
सदरचा अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक सोहळा संत नामदेव महाराजांचे वंशज सर्वश्री ह.भ.प. माधव महाराज, मुकुंद महाराज, केशव महाराज, कृष्णदास महाराज, ज्ञानेश्वर महाराज नामदास यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असून यासाठी सर्वश्री ह.भ.प. एकनाथ महाराज, निवृत्ती महाराज, मुरारी महाराज, विठ्ठल महाराज, हरि महाराज, भावार्थ महाराज, आदित्य महाराज यांच्यासह संत नामदेव महाराज वंशज, नामदास महाराज परिवार, संत नामदेव महाराज फड, संत नामदेव-जनाबाई महाराज सेवा प्रतिष्ठान परिश्रम घेत आहे. वरील सर्व धार्मिक कार्यक्रमास संत नामदेव महाराज भक्त परिवार व समस्त शिंपी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नामदास महाराजांनी केले आहे.