पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार आणि त्यांच्या सोबत असणारे सहकारी यांचे विमान अपघातात आज अकस्मात निधन झाले. त्याबद्दल आज स्वेरीमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डीजीटेक रोबोटीक्स इंडीया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजित गटे यांच्या हस्ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. यशपाल खेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जीवनशैली, कार्य करण्याची पद्धत याबाबत सविस्तर माहिती दिली तर संचालक अजित गटे यांनी श्रद्धांजली पर भाषणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या लक्षवेधी कार्य पद्धतीवर विशेष प्रकाश टाकला.
स्वेरीचे सचिव डॉ. सुरज रोंगे हे जड अंत:करणाने म्हणाले कि, ‘कामाचा उरक, प्रशासनावरील वचक आणि रोखठोक स्वभाव, महाराष्ट्राच्या राजकारणातील 'दादा' व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं. दादा, तुमचा तो पहाटे पासून काम करण्याचा उत्साह आणि विकासाचा ध्यास आता पुन्हा दिसणार नाही, ही जाणीवच सुन्न करणारी आहे. महाराष्ट्राने आज एक कार्यक्षम प्रशासक आणि जमिनीवरचा नेता गमावला आहे. दादांना प्रत्यक्षात कधी भेटलो नसलो तरी त्यांच्या निधनाच्या बातमीने डोळ्यात अश्रू आले, असा त्यांचा व त्यांच्या कार्याचा सर्वांच्या मनावर प्रभाव आहे. तुमचे कार्य आणि तुमचे विचार उभ्या महाराष्ट्राच्या मनात सदैव जिवंत राहतील.’ उपस्थित असलेल्या सर्वांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व त्यांच्या समवेत निधन झालेल्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व पालक आदी उपस्थित होते.

