पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजयजी नेवासकर आणि पुणे, पिंपरी चिंचवडमधील ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी(सर्वांची नावं माहीत नसेलमुळे, अध्यक्ष व पदाधिकारी असा उल्लेख केलेला आहे, क्षमस्व)यांच्या समवेत, समाजबांधव एकत्रित येवून, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा, 675 वा संजीवन समाधी सोहळा, पुण्यामध्ये गणेश कला क्रिडा मंच, स्वारगेट या ठिकाणी,भव्य स्वरूपात साजरा झाला.
पुणे, पिंपरी चिंचवड मधील ज्ञाती संस्था यांच्या एकीमुळे आणि सहकार्यामुळेच, या कार्यक्रमाची सुरुवात दिमाखदार झाली असावी, असे मला वाटतेय..!
खरंतर कार्यक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे पुण्यामधील ज्ञाती संस्था एकत्र येवून, आखीव रेखीव कार्यक्रमाचे आयोजन करुन, एकाच छत्राखाली एकत्र येत...
एकीचं बळ..मिळते फळ..!
याची अनुभूती पहावयास मिळाली..!
या कार्यक्रमातील वैशिष्ठ म्हणजे, वय वर्ष 81 पूर्ण केलेल्या ज्येष्ठांचा, सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आणि धान्यतुला करत असतानाच, 81 दिव्यांनी ओवाळताना, सत्कार मूर्तींच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता पाहून, मन मात्र भारावून गेलं..!
81 वर्षे पूर्ण केलेल्या एकूण 14 व्यक्तिमत्त्वांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला यामध्ये श्री गोविंद रामचंद्र बोत्रे, श्री रामचंद्र गंगाधर पोटे, श्री प्रमोद बबन हिरवे, श्री मोरेश्वर प्रल्हाद हेंद्रे, श्री वसंतराव अनंत बारटक्के, श्रीमती अनुसुया आप्पासाहेब सदावर्ते, श्रीमती कुसुम विठ्ठल किकले, श्रीमती मालन पांडुरंग कल्याणकर, श्रीमती मंदाकिनी प्रल्हाद माळवदे, श्रीमती डॉ. सुमंगला विजय बाकरे, श्रीमती सुभद्रा शिवराम नामदास, श्रीमती वत्सला मधुकर महाजन, श्रीमती विजयालक्ष्मी मनोहर पाडळकर आणि शताब्दी वर्षात पदार्पणा करणारे माधवजी सुदामदेव झणकर यांना मानचिन्ह, सन्मानपत्र, पुणेरी पगडी आणि संपूर्ण पोषाख देवून त्यांची धान्यतुला करुन, या कार्यक्रमात यथोचित गौरव करण्यात आला..!
प्रतिकुल परिस्थितीवर मात करून शंभरी पार करणारे, शताब्दी बहाद्दर श्री माधवजी सुदामदेव झणकर यांनी तर या कार्यक्रमाची नक्कीच शोभा वाढवलेली जाणवली. त्यांचे प्रेम आणि आशिर्वाद तर लाख मोलाचे मिळालेत हे त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रूने जाणवलं..! आणि आयोजक कृतार्थ झाले.
सुग्रास भोजनाचा आस्वाद घेत असताना, म्हणजेच जिलेबी, मठ्ठा, पूरीभाजी, आळूचं गरगटं, मसालेभात, कोशिंबीर यांनी तर कार्यक्रमातील, भोजनाची रंगतच वाढविली आणि मन तृप्त केलं..!
तदनंतर अभंगवाणी सादर करणारे, श्री गणेश शिंदे आणि सहकारी यांचा मोगरा फुलला, हा बहारदार कार्यक्रम मंत्रमुग्ध करुन गेला. हॉलमधील प्रत्येकजण या कार्यक्रमात, मंत्रमुग्ध आणि रमलेला जाणवत होता. संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांची जीवनशैली आणि भगवंतावरील असलेली अढळ निष्ठा कथन करताना, मराठी भक्ती गीतांची गुंफण, अतिशय मनमोहक जाणवली. खरंतर हा कार्यक्रम संपूच नये, असेच वाटत होते..!
पूर्वसंध्येच्या कार्यक्रमातील, मुख्य आकर्षण म्हणजे पंढरपूर या ठिकाणी, नामदेव महाराज यांचे स्मारक व्हावे आणि समाज भूषण पुरस्कार..!
नामदेव समाजोन्नती परिषदेचे सरचिटणीस अजय फुटाणे यांनी, पंढरपूर येथील नामदेव स्मारकासाठी, लवकरात लवकर जागा मिळावी, आणि नामदेव महाराजांचे भव्य स्वरूपात स्मारक निर्माण व्हावे. अशी अपेक्षा केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री महोदय नामदार मुरलीधर आण्णा मोहोळ आणि महाराष्ट्र राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत व्यक्त केली..!
संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या स्मारकासाठी आम्ही नेहमीच आपल्या सोबतच असणार, याची ग्वाही देत, मंत्री महोदय यांच्या शुभहस्ते आणि नामदेव महाराजांचे 16 वे वंशज असलेले, श्री गुरू ह. भ. प. मुकुंद महाराज यांच्या अध्यक्षतेखाली, समाज भूषण पुरस्कार माजी आमदार असलेले, तसेच शिरगांव येथील श्री साई संस्थान प्रतीशिर्डीचे मुख्य विश्वस्त असलेले, प्रकाशजी देवळे यांना प्रदान करण्यात आला. खरं सांगायचं म्हटले तर हा कार्यक्रम यशस्वी आणि नेत्रदीपकच झाला..!
संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचे 16 वे वंशज असलेले, श्री गुरू ह. भ. प. मुकुंद महाराज यांनी, सर्व समाज बंधूंनी नामदेव स्मारकासाठी संघटीत राहून, समाजात एकी निर्माण झाली पाहिजे, असे आवाहन केले..!
या पुरस्काराचे मानकरी असलेले, श्री साई संस्थान प्रतिशिर्डीचे (शिरगाव) मुख्य विश्वस्त असलेले व माजी आमदार असलेले, प्रकाशजी देवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले..!
यावेळी प्रकाश देवळे म्हणाले की,मला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असतील, मात्र नामदेव समाजोन्नती परिषदेने, त्याचप्रमाणे ज्ञाती संस्थेने, या पुरस्कारासाठी माझी निवड करुन, हा समाजभूषण पुरस्कार देऊन, खरंतर घरच्याच लोकांनी मला शाबासकीची थाप दिलेली जाणवली. घरातल्या लोकांनीच केलेला सत्कार मला आनंददायी वाटतोय. हा पुरस्कार माझाच नाही तर सर्व समाज बांधवांचा आहे, आणि मी हा पुरस्कार सर्व नामदेव शिंपी समाजाला अर्पण करतोय. त्याचप्रमाणे सन्मानाप्रित्यर्थ मला जो 51000 रुपयेचा चेक मिळाला आहे, तो मी नामदेव समाजोन्नती परिषदेला, गोरगरीब मुलांच्या शैक्षणिक कार्याकरीता सुपूर्त करतोय. अखेरपर्यंत मी आपल्या सोबतच असेन, याची ग्वाही देत, सर्व पदाधिकारी यांचे जाहीर आभार व्यक्त केले..!
ना. स. प. चे अध्यक्ष, संजयजी नेवासकर, ना. स. प. चे सरचिटणीस अजयजी फुटाणे, ना. स. प. चे मुख्य विश्वस्त राजेन्द्रजी पोरे यांच्या नेतृत्वाखाली, ना. स. प. चे, पुणे शहर अध्यक्ष, संदिप लचके यांची टीम आणि पिंपरी चिंचवडमधील ना. स. प. चे शहर अध्यक्ष, एकनाथराव सदावर्ते यांची टीम व कार्यकर्त्यांनी भाग घेवून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, खूपच प्रयत्नशील असल्याचे आढळून आले.
एवढंच नव्हेतर घरातील सौ सिमावहिनी यांच्यासह चिरंजीव, सुनबाई, कन्या आणि नातू यांचाही समावेश जाणवत होता. विशेष आकर्षण म्हणजे या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात, सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे सूत्रसंचलन करणारे, अनिकेत दानवे आणि संध्याकाळच्या मंत्री महोदयांच्या सत्रात रेणुका महाजन यांनी गोड शब्दात सुत्रसंचलन करत, कार्यक्रमाची उंची वाढविली आहे. त्याचप्रमाणे प्रविणजी शित्रे, दिनेशजी कुमठेकर, विक्रांतजी डोंगरे यांच्यासह विश्वस्त, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुध्दा या कार्यक्रमात सहभागी घेतला होता. या कार्यक्रमास सुमारे ७००० समाज बांधव उपस्थित होते.