पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून ‘स्वेरी लॉ कॉलेज, पंढरपूर’ या नावाने नवीन महाविद्यालय सुरु झाले आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
सन १९९८ साली गोपाळपूरच्या माळरानावर स्वेरी म्हणजेच श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर या संस्थेची पायाभरणी करीत सर्वप्रथम इंजिनिअरिंगचे महाविद्यालय सुरू केले. हा पदवी अभ्यासक्रम सुरु केल्यानंतर अथक परिश्रमाच्या जोरावर व्यावसायिक शिक्षणाचा 'पंढरपूर पॅटर्न' यशस्वी पणे राबवण्यात आला. त्यानंतर 'पंढरपूर पॅटर्न' च्या माध्यमातून शिक्षणातील विविध प्रयोग व उपक्रम राबवीत असताना स्वेरीच्या कार्याला यश मिळतच राहिले. दरम्यान बी. फार्मसी, डी.फार्मसी, डिप्लोमा अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांची महाविद्यालये स्थापन करण्यात आली. कालांतराने या महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी असलेला एम.बी.ए. हा अभ्यासक्रम २००८ पासून सुरु करण्यात आला. सोबतीला एम.ई./एम.टेक., एम. फार्मसी, एम.सी.ए. व इंजिनिअरिंगचे पीएच.डी. हे अभ्यासक्रम देखील सुरु करण्यात आले. यानंतर पालकांच्या अपेक्षा पूर्ण करत असताना ‘लॉ कॉलेज' देखील व्हावे अशी आग्रही मागणी पंढरपूर पंचक्रोशीतील पालकांनी केली. त्या अनुषंगाने संस्थेतर्फे लॉ कॉलेजच्या स्थापनेसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले.
स्वेरीची गुणवत्ता व शिक्षण संस्कृती लक्षात घेता प्रत्येकी ६० प्रवेश क्षमतेसह बी.ए.एल.एल.बी. (५ वर्षे) व एल.एल.बी. (३ वर्षे) या अभ्यासक्रमांसाठी बार कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडून मान्यता तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कडून प्रथम संल्लग्निकरणास मान्यता मिळाली आहे. एकूणच स्वेरीतील ‘पंढरपूर पॅटर्न इन प्रोफेशनल एज्युकेशन’, आदरयुक्त शिस्त आणि संस्कार, वार्षिक परीक्षांचे निकाल, गुणवत्ता आणि प्लेसमेंट मधून होणारी विद्यार्थ्यांची विक्रमी निवड या पार्श्वभूमीवर या स्वेरी लॉ कॉलेज, पंढरपूरचे देखील जोरदार स्वागत होत असल्याचे दिसून येते.
यामुळे आता स्वेरीमध्ये अभियंता, फार्मासिस्ट बरोबरच वकील आणि कायदेतज्ज्ञ देखील घडणार आहेत, हे मात्र नक्की. तीन वर्ष कालावधी असलेल्या एल.एल.बी. च्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहीतीसाठी प्रवेश प्रक्रिया विभागाचे अधिष्ठाता डॉ.करण पाटील (मोबा.नंबर–९५९५९२११५४) व प्रा. स्वप्नाली गडदवार (मोबा.नं.-९३७३०२३०९७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.