पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी यात्रा मुख्य सोहळा 06 जुलै 2025 रोजी संपन्न झाला. यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. या कालावधीत सुमारे 30 हजारहून अधिक रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय येथे तसेच शहराच्या विविध भागात स्थापित केलेल्या 10 ट्रॉमा व आयसीयु सेंटर मधुन सुमारे 70 हजारहुन अधिक अशा एकुण एक लाखाहुन अधिक रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. दिपक धोत्रे यांनी दिली.
आषाढी यात्रा दिनांक 01 ते 10 जुलै 2025 या कालावधीमध्ये राज्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, पुणे विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक क्षयरोग व कुष्ठरोग महाराष्ट्र राज्य, पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. प्रशांत वाडीकर, मा. जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांच्या संकल्पनेतुन तीन रस्ता, भक्ती सागर (65 एकर), शेगांव दुमाला, वाळवंट-2, पत्रा शेड, सारडा भवन, काळा मारुती, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दर्शन मंडप, या शहरातील गर्दीच्या 10 ठिकाणी व उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे ट्रॉमा व आयसीयु सेंटर स्थापन करण्यात आले होते. या ठिकाणी 232 गंभीर रुग्णांना उपचारासाठी दाखल करून त्यांच्यावर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आले. याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय येथील आयसीयु सेंटरमध्ये पुरुष 60, व स्त्री 43 अशा तब्बल 103 गंभीर रुग्णांना दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या ठिकाणी इंडियन मेडीकल असोसिएशन पंढरपुर , मंगळवेढा, अकलुज शाखेच्या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना मोफत सेवा दिली असल्याचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. धोत्रे यांनी सांगितले.
यात्रा कालावधीत विविध आजाराने त्रस्त असलेल्या सुमारे 900 हुन अधिक रुग्णांना दाखल करुन उपचार करण्यात आले तसेच 1 हजार 500 हुन अधिक रुग्णांच्या रक्त, लघवी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. तर 400 हुन अधिक रुग्णांचे एक्स रे, 150 हुन अधिक रुग्णांचे सी. टी स्कॅन करण्यात आले. २७१ रुग्णांची ईसीजी करण्यात आले अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. प्रसन्न भातलवंडे यांनी दिली.
उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणुन रुग्णालयीन स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला होता तसेच रुग्णालयाच्या प्रत्येक विभागात पिण्याच्या शुध्द पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली होती यासाठी सर्व वैद्यकिय अधिकारी, अधिसेविका, परिसेविका, अधिपरिचारीका, पॅरामेडीकल स्टाफ, व वर्ग-4 कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .
हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या रुग्णांवर तात्काळ निदान
उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे नागुराव रामभाऊ रिचे वय वर्षे 72 राहणार मु.पो अजनगाव, जिल्हा अमरावती हा पुरुष रुग्ण 108 रुग्णवाहिकेमार्फत छातीत तीव्र वेदनेची तक्रार घेवुन आला असता त्याचा आपतकालीन विभागामध्ये त्वरीत ईसीजी काढण्यात आला असता उपस्थित असलेल्या फिजीशिअन डॉ. संग्राम गायकवाड यांनी सदर रुग्णास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे निदान केले व आयसीयु मध्ये त्वरीत दाखल केले असता तिथे उपस्थित असलेले हृदयरोग तज्ञ डॉ. कुलदीप कोलपकवार व त्यांच्या संपुर्ण टीमने रुग्णाला त्वरीत थ्रोम्बोलाईज करुन त्याची प्रकृती स्थिर केली व रुग्णाला धोक्यातुन बाहेर काढले.
याचबरोबर हदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या 7 रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे प्रथमोपचार देण्यात आले व यानंतर राज्य शासनाच्या स्टेमी प्रोजेक्ट अंतर्गत महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातुन पंढरपुरातील खाजगी रुग्णालयामध्ये सदरील रुग्णांवर मोफत अॅन्जीओग्राफी व अॅन्जीओप्लास्टी करुन त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले. यासोबत दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, फिट येणे, औषध प्राशन केलेले, सर्पदंश, विजेचा शॉक बसलेले व अशा इतर सुमारे 103 रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय येथील आयसीयु मध्ये दाखल करुन उपचार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.