अक्कलकोट प्रतिनिधी तेज न्यूज
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज ( दि. 5 जुन ) अक्कलकोट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक नेत्यांची उपस्थिती होती.
सिद्धाराम म्हेत्रे यांनी पक्षप्रवेशानंतर काँग्रेसवर निशाणा साधत सांगितले की, "शिवसेना हाच खऱ्या अर्थाने सेक्युलर पक्ष आहे. त्यामुळे इथे काम करताना मला कोणतीही अडचण भासणार नाही."
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांची उपस्थिती
या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार राजू खरे यांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली असून, त्यांच्या उपस्थितीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सिद्धाराम म्हेत्रे हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून चार वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले असून, त्यांनी राज्याच्या गृहराज्यमंत्रीपदाची जबाबदारीही यशस्वीरित्या पार पाडली आहे.
या महत्त्वपूर्ण घडामोडीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) ला सोलापूर जिल्ह्यात मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे.