पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
संत नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई महाराज यांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा यावर्षी तीर्थक्षेत्र पंढरी नगरीत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असून दि. 23 व 24 जुलै रोजी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील संत नामदेव भक्त, शिंपी समाज बांधव, महाराज मंडळी, वारकरी, फडकरी मंडळींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. मुकुंद महाराज नामदास व अ.भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. महेश ढवळे यांनी केले आहे.
संत नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई महाराज यांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा यावर्षी तीर्थक्षेत्र पंढरी नगरीत दि. 23 व 24 जुलै रोजी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त संत नामदेव मंदिर येथे अ.भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीत समाधी सोहळा उत्सव, कार्यक्रमाची रुपरेषा, संत नामदेव महाराज स्मारक, संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या संत नामदेव मंदिराच्या जीर्णोध्दाराबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना ह.भ.प. नामदास महाराज म्हणाले, संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे सुमारे महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मुख्य कार्यक्रमाच्या अंतर्गत सोमवार दि. 21 जुलै, आषाढ कृ. एकादशी दिवशी दिंडी सोहळा, मंगळवार दि. 22 जुलै रोजी द्वादशी दिवशी क्षिरापत व बुधवार दि. 23 जुलै रोजी संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यावरील कीर्तन, गुरुवार दि. 24 जुलै रोजी अमावस्ये दिवशी सायंकाळी दिंडी लवाजम्यासह नगर प्रदक्षिणा होणार असून या सर्व कार्यक्रमांना समाज बांधव, नामदेव भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
संस्थापक अॅड. महेश ढवळे म्हणाले, यावर्षी संत नामदेव महाराजांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा पंढरपुरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असून दि. 23 व दि. 24 जुलै रोजी दोन दिवस भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह मंत्री महोदयांनाही बोलविण्याचा मानस असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. सदर कार्यक्रमात महाराष्ट्रासह देशभरातील संत नामदेव भक्त, शिंपी समाज बांधव, महाराज मंडळी, फडकरी व वारकरी मंडळींनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी ह.भ.प. सर्वश्री माधव महाराज नामदास, मुकुंद महाराज नामदास, ज्ञानेश्वर महाराज नामदास, निवृत्ती महाराज नामदास, हरी महाराज नामदास, एकसंघाचे प्रदेशाध्यक्ष व शिंपी समाज पंढरपूरचे अध्यक्ष गणेश उंडाळे, सचिव विलास पोरे, जयवंत कांबळे, राहुल महाडिक, प्रथमेश परांडकर, विशाल धट व समाज बांधव उपस्थित होते.