मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ‘लाडकी बहीण योजना’ ही राज्यातील अनेक महिलांसाठी एक मोठा दिलासा ठरली आहे. महिलांना दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात मिळत असल्याने त्यांना घरखर्च, मुलांच्या शिक्षण, आरोग्यसुविधा आणि इतर गरजांमध्ये आर्थिक मदत मिळत आहे.
सध्या सर्वांचं लक्ष एप्रिल २०२५ च्या हप्त्याकडे लागले आहे. हा हप्ता कधी जमा होणार, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. चला, पाहूया यासंदर्भातील सविस्तर माहिती.
एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार?
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ९ हप्त्यांचे यशस्वी वाटप झाले आहे. एप्रिल २०२५ चा १० वा हप्ता अजून मिळालेला नाही. मागील अनुभव पाहता, सरकार सहसा तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हप्ता जमा करतं. त्यामुळे अंदाजानुसार २० एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.
हप्त्या मिळण्यास उशीर का होतो आहे?
या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही प्रशासकीय अडचणी आल्या आहेत. आयकर विभागाकडून महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे सुमारे २ कोटी अर्ज प्रक्रिया थांबलेली आहे. पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय हप्ता जमा करता येत नाही.
अपात्र अर्जांची वाढती संख्या
अर्जांची तपासणी करताना सरकारने ९ लाखांहून अधिक अर्ज अपात्र ठरवले आहेत. काही अर्जदारांनी चुकीची माहिती दिली, तर काहीजणांनी अटी पूर्ण न केल्यामुळे अपात्र ठरले. मार्च २०२५ मध्ये किती अर्ज बाद झाले, हे अद्याप समोर आलेलं नाही, परंतु अपात्र अर्जाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही महिलांना एप्रिलचा हप्ता उशिरा मिळू शकतो.
नवीन तांत्रिक सुधारणा: ‘लाडकी बहीण अॅप’ येणार
योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकार ‘Ladki Bahin App’ सुरू करणार आहे. याद्वारे लाभार्थींना हप्त्यांची माहिती, अर्जाची स्थिती, आणि इतर अद्यतने मिळणार आहेत. हे अॅप पुढील महिन्यांत सार्वजनिक होण्याची शक्यता आहे.