अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेत मोलाचे योगदान देणाऱ्या स्व. श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील (आक्कासाहेब) यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे प्रथम पारितोषिक वितरण समारंभ, गुणवंत विद्यार्थी व देणगीदारांचा सत्कार तसेच गुरुपौर्णिमा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक पांडुरंग एकतपुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर टेंगळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दहावी, बारावी, शिष्यवृत्ती आणि एन.एम.एम.एस. परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
समारंभास शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रामभाऊ गायकवाड, उत्कर्ष शेटे, प्रशाला समितीचे सदस्य ॲड. रणजीत माने-देशमुख, देणगीदार बाजीराव कोळेकर, दत्तात्रय पिसे, कल्लाप्पा सूर्यवंशी, लक्ष्मी वाघमारे, संग्रामसिंह भांगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी प्रास्ताविकातून शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संस्थेची स्थापना केली. काही विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही संस्था आज ५० हून अधिक शाखांमधून ३० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे.
ते पुढे म्हणाले की, संस्थेचे मार्गदर्शक संचालक मा. श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, अध्यक्ष मा.श्री. संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालिका मा. कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती मा. चि. सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता सातत्याने उंचावत आहे. शासनाच्या "मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा" अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान विद्यालयाने पटकावला असून विद्यालयाला गुणवत्तेची तब्बल ७५ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, एन.एम.एम.एस. व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यालयाचे विद्यार्थी सातत्याने यश संपादन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महर्षी मेरिट मिशन, सरप्राईज टेस्ट, स्पोकन इंग्लिश यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत व बक्षिसे उपलब्ध करून देणाऱ्या देणगीदारांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थी ओम खडके याने मनोगतात गुरुंचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्थान अधोरेखित करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर टेंगळे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, "ध्येय गाठण्यासाठी सातत्य, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांना पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून जीवनात मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे. कोणत्याही अपयशाने खचून न जाता आत्मविश्वासाने पुढे जात राहणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे." त्यांनी अकलूज हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र असल्याचे नमूद करत येथील विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत असल्याचा अभिमान व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेकी वापर टाळावा आणि पालकांनीही मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवावे, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.
अध्यक्षीय समारोपात पांडुरंग एकतपुरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.
गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यालयाच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक, व्यवसाय व द्विलक्षी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी वैभवी नलवडे हिने प्रास्ताविकातून भारतीय संस्कृतीतील गुरुंचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
कार्यक्रमास उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे, शिक्षक प्रतिनिधी बलभीम काकुळे, संजय राऊत, दीपाली लोखंडे, कल्पना मोरे, शिक्षकेत्तर प्रतिनिधी नवनाथ बळवंतराव, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा राजगुरू व स्मिता दळवी यांनी केले. पारितोषिक विजेत्यांची नावे अलिशा काझी व दादा ढोले यांनी जाहीर केली, तर दत्तात्रय घंटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

