जोगेश्वरी प्रतिनिधी तेज न्यूज उदय वाघवणकर
उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रांतील जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील श्यामनगर ते पश्चिम द्रुतगती महामार्ग पर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे रखडलेले काम खासदार रविंद्र वायकर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे मार्च महिन्यात सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या के - पूर्व विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.भविष्यातील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील होणारी वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेऊन खासदार रविंद्र वायकर यांनी स्थायी समितीवर असताना त्यांनी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच्या रुंदीकरणाचे काम सुरु केले.हे काम श्यामनगर तलाव पर्यंत पूर्ण करण्यात आले.
परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तसेच मेट्रोच्या कामामुळे श्यामनगर ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले होते.खासदार रविंद्र वायकर यांनी हे काम सुरु करण्यासाठी मेट्रो व मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या समवेत बैठकाही घेतल्या होत्या.या बैठकीमुळे येथील उर्वरित रस्ता रुंदीकरणाचे काम लवकरच सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.श्यामनगर ते पश्चिम द्रुतगती महामार्ग पर्यंतच्या रस्त्याची लांबी ८०० मीटर आहे.
याठिकाणी दक्षिण भागात ५६ बांधकामे तर उत्तरेकडे ९६ बांधकामे बाधित होणार आहे.सुरुवातीला दक्षिण भागातील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करण्यात येणार असून यासाठी ५६ बांधकामाना (प्रकल्पबाधित) नोटीसा महानगरपालिकेमार्फत देण्यात येणार आहे.या कामाचे ड्राफ्ट अनेक्स्च्रर तयार असून अंतिम यादी बनवण्याचे काम प्रगीत पथावर असून हे काम येत्या २० दिवसामध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.रस्ता रुंदीकरणाचे काम टप्प्या टप्प्याने पूर्ण करण्यात येणार असून दक्षिण भागाचे काम पूर्ण झाल्यावर उत्तर भागाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिका रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी बांधकामे काढणार असून मेट्रो रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या के - पूर्व विभागातील दुय्यम अभियंता सोनावणे यांनी दिली.मार्च २०२५ पासून या कामाला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.