भाळवणी प्रतिनिधी
मुली व महिलांच्या सुरक्षिततेकरता निर्भया पथकाची साथ राहणार आहे.त्यामुळे मुली, महिलांनी घाबरण्याची गरज नाही. निर्भया पथक ही मुलींच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेणार असल्याचे मत विद्यार्थ्यांस समुपदेशन करताना निर्भया पथक पंढरपूर विभागाचे ए.पी.आय. रेळेकर यांनी व्यक्त केले.
पंढरपूर तालुकयातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स विद्यालयात निर्भया पथक पंढरपूर विभागाचे ए.पी.आय. रेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया टिम महिला पोलिस हवालदार स्वाती लोंढे पोलीस नाईक सहत सावंत, महिला पोलिस कॉन्स्टेबल निर्मला वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी आवटे, समाधान पवार यांनी मुली - मुलांशी सुसंवाद साधून मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम सखी सावित्री मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य एस डी रोकडे हे होते.
यावेळी महिलांची सुरक्षा, सुरक्षा सुधारण्याच्या उद्देशाने उपक्रम राबविणे व त्यावर लक्ष केंद्रित करणे, मुलींच्या सुरक्षा कायदा तसेच निर्भया पथकाची कामगिरी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी रेळेकर म्हणाल्या की, आम्ही आपणास ताबडतोब मदत करू, मुलींची व महिलांची सुरक्षितता व छेडछाडीस प्रतिबंध करणे हे निर्भया पथकाचे मुख्य उद्दिष्ट असून ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही कार्यरत आहोत. तरी छेडछाडीचे प्रकार सहन करू नका.पुढे या तक्रार द्या. कोणालाही घाबरण्याची गरज नाही. मुलांनी आई-वडिलांपासून काहीही लपवू नका. मुलींच्या मनामनापर्यंत पोहोचणे व त्यांना बोलते करणे हा निर्भया पथकाचा उद्देश असून अन्याय सहन करू नका. विद्यार्थ्यांना सशक्त बनविण्यासाठी त्यांनी प्रत्येक परिस्थितीत कायदेशीर मदत घेतली पाहिजे. टिंगल टवाळी करुन छेडछाड केली जाते, अशा जर काही घटना घडल्या तर मुलींनी सतर्क राहून तात्काळ 118 हा हेल्पलाइनवर नंबर डायल करून माहिती द्यावी, असे आवाहनही निर्भया पथकाच्या वतीने रेळेकर यांनी केले आहे .
यावेळी प्राचार्य रोकडे म्हणाले, निर्भया पथक गेली बरीच वर्षापासून सर्व विद्यालये महाविद्यालये मध्ये जाऊन मार्गदर्शन करून विद्यार्थी जागृतीचे मोलाचे सहकार्य करीत आहे. या पथकातील सदस्यांची कामगिरी ही अत्यंत चांगली आहे. त्यामुळे विद्यालयातील, महाविद्यालयातील मुला मुलींवर शिस्तीचे चांगले संस्कार होत आहेत. निर्भया पथकामार्फत करत असलेले काम खरेच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल सर्व अधिकारी यांना विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य रोकडे यांनी धन्यवाद मानले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. के. भोसले यांनी केले. निर्भया पथकाची ओळख एस. एस. गुळवे यांनी करून दिलं तर शेवटी यू. व्ही. नागटिळक यांनी आभार मानले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, - शिक्षिका, विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते.