पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तर्फे ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२४’ या राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या स्पर्धेच्या अंतर्गत महाविद्यालय स्तरावर ‘स्वेरीज् स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन 'शिक्षक दिना'चे औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा दि. १० सप्टेंबर, २०२४ रोजी महाविद्यालयाच्या परिसरात भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या तांत्रिक कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२४’ हा विद्यार्थ्यांना त्यांच्या तांत्रिक कौशल्यांची चाचणी घेण्याचे व नवनवीन तांत्रिक उपाय शोधण्याचे एक महत्वाचे व्यासपीठ आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सृर्जनशील कल्पनांना साकार करण्याची आणि उद्योग, शिक्षण आणि सरकारी संस्थांसमोर आपले प्रकल्प मांडण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना वास्तविक जगातील समस्यांवर तांत्रिक उपाय शोधण्याचा अनोखा अनुभव मिळणार आहे. या हॅकाथॉनमध्ये स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विविध विभागांतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभाग घेणार आहेत.
या स्पर्धेच्या पोस्टरच्या उदघाटन प्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, संस्थेअंतर्गत असलेल्या डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी. मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा.एस. व्ही. मांडवे, अभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी अवधूत भोसले, सोनाली करवीर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. 'स्वेरीज् स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२४’ या स्पर्धेचे उदघाटन दि.१० सप्टेंबरला संस्थेचे सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामधील प्रा. डॉ. पी आर. कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही स्पर्धा नक्कीच एक उत्तम संधी ठरेल. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या तांत्रिक आणि सृजनशील कौशल्यांचा वापर करून नवीन उपाय शोधण्याची प्रेरणा मिळेल. स्पर्धेतील सर्वोत्तम प्रकल्पांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्याची आणि मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळण्याची संधी आहे. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. मीनाक्षी पवार म्हणाल्या कि, 'ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनातील एक महत्त्वाची पायरी ठरणार असून या हॅकाथॉनमध्ये जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपली कौशल्ये सिद्ध करावीत.' 'स्वेरीज् स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२४’ हे राष्ट्रीय स्तरावरील ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२४’ मध्ये सहभाग घेण्याचे प्रवेशद्वार आहे. महाविद्यालय स्तरावरील हॅकाथॉनमध्ये निवडल्या गेलेल्या ५० संघांना राष्ट्रीय स्तरावरील अंतिम हॅकाथॉन-२०२४ मध्ये सहभाग घेण्यासाठी शिफारस केली जाईल.
तसेच या महाविद्यालय स्तरावरील स्पर्धेत निवडलेल्या सर्वोत्तम तीन संघांना प्रमाणपत्रासह रोख बक्षिसे दिली जातील आणि सर्व इतर सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए.पी. केने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इन्स्टिट्यूशनस् इनोवेशन कौन्सिलचे समन्वयक प्रा. डी. डी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डी. टी. काशीद हे या स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम करत आहेत.