पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र सुरू झाली असून त्याबाबतचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र प्राप्त झाल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून मुदत संपल्याने जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र बंद होती. त्यामुळे विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी नागरीकांना फक्त महा ई सेवा केंद्रावर अवलंबून राहावे लागत असे, तेथील व्यवस्थेवरील ताण कमी व्हावा यासाठी प्रत्येक तहसील कार्यालय परिसरात सेतू सुविधा केंद्र सुरू होणे गरजेचे होते.
नुकतेच सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत,त्यामुळे नवीन प्रवेशासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता पाल्य व पालकांना असल्याने जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र त्वरित सुरू करण्यात यावीत यासाठी ग्राहक पंचायतीने पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू ठेवला होता. नुकतेच निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांच्याकडून याबाबत उत्तर मिळाले असून त्याप्रमाणे गुजरात इन्फोटेक लि. अहमदाबाद या एजन्सी मार्फत जिल्ह्यातील १२ सेतू सुविधा केंद्र सुरू झालेली आहेत.
तरी नागरीकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, सदस्य सुभाष सरदेशमुख,जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते, सदस्य अण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अल्लापूरकर,तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,संघटक महेश भोसले,धनंजय पंधे यांनी केले आहे.