सोलापूर प्रतिनीधी तेज न्यूज
यातील आरोपी नामे संजय शामराव कलकोटे, गणपत विठ्ठ्ल कलकोटे, कुसुम शामराव कलकोटे, राम महादेव कलकोटे, दयानंद इरान्ना कल्याणशेट्टी सर्व रा. चुंगी, ता. अक्कलकोट, सोलापूर यांची सिव्हील इंजिनिअरवर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मा. जिल्हा व सत्र न्यानाधीश आय. ए. शेख मॅडम यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, दि. १०/०९/२०२० रोजी दुपारी मौजे चुंगी शिवारात राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम शासनाच्या वहिवाटीच्या हद्दीत सुरु करण्यात आलेले होते. त्यावेळी पोलीस बंदोबस्तात काम सुरु करण्यात आलेले होते. काम सुरु करताच आरोपी नामे संजय शामराव कलकोटे, गणपत विठ्ठ्ल कलकोटे, कुसुम शामराव कलकोटे, राम महादेव कलकोटे, दयानंद इरान्ना कल्याणशेट्टी सर्व रा. चुंगी, ता. अक्कलकोट, सोलापूर हे चुंगी शिवारातील काम सुरु असलेल्या ठिकाणी रोडवर येवून आम्हास मोबदला द्या नाहीतर तुम्ही काम बंद करा असे म्हणून कामाचे ठिकाणी येऊन चालू असलेले सरकारी कामात अडथळा आणून सरकारी काम बंद पाडले व काम करू देणार नाही असे म्हणू लागले. त्यावेळी पोलिसांनी व फिर्यादी नामे भीमाशंकर मिटकरे यांनी यातील आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला पण आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणला. अशा आशयाची फिर्याद अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे दाखल केलेली होती. सदर कामी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले.
सदर खटल्याच्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी महत्वाचे साक्षीदार म्हणजे फिर्यादी व सदर केस चे तपासाधिकारी हे होते.
सदर खटल्यात उलटतपासणीवेळी अनेक महत्वाच्या बाबी समोर आल्या त्यापैकी सदर फिर्यादी अभियंता याने उलटतपासणीवेळी कबुल केले की सदर शेतकऱ्यांनी महामार्ग विभागाविरुद्ध सदर घटनेपूर्वी मा. उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती व मा. उच्च न्यायालयाने सदर रस्त्याच्या कामास तात्पुरती स्थगिती दिलेली होती. तसेच सदर घटनास्थळी कामाच्यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी सदरचा घडलेला तथाकथित प्रकार लागलीच पोलीस स्टेशनला कळविणे क्रमप्राप्त होते परंतु तशी कोणतीही माहिती तात्काळ पोलीस स्टेशन ला देण्यात आलेली नाही याचाच अर्थ असा होतो की अशी कोणतीच तथाकथीत घटना घडली नसल्यामुळे कोणतीच माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आलेली नाही. फक्त आणि फक्त महामार्ग विभागाविरुद्ध सदर आरोपींनी घटनेपूर्वी मा. उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्याचा राग आल्यामुळे आकसापोटी सदरची खोटी फिर्याद दाखल केल्याची शक्यता नाकारता येत नाही असा युक्तिवाद आरोपी च्यावतीने करण्यात आला.
सदर बाबींचा विचार करून यातील आरोपी नामे संजय शामराव कलकोटे, गणपत विठ्ठ्ल कलकोटे, कुसुम शामराव कलकोटे, राम महादेव कलकोटे, दयानंद इरान्ना कल्याणशेट्टी सर्व रा. चुंगी, ता. अक्कलकोट, सोलापूर यांची मा. जिल्हा व सत्र न्यानाधीश आय. ए. शेख मॅडम यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपींतर्फे अँड. अभिजित इटकर, अँड. दिलीप जगताप, अँड. राम शिंदे, अँड. संतोष आवळे, अँड. फैयाज शेख, अँड. शिवाजी कांबळे, अँड. सुमित लवटे, यांनी काम पाहिले.