मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीने त्यांच्या सगळ्या जागा जाहीर केल्या आहेत. माढा आणि उत्तर मुंबई हे दोन मतदारसंघ आणि अनुक्रमे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला गेले आहेत. इथले उमेदवार जाहीर झालेले नाहीत. मात्र सगळ्या जागा जाहीर झाल्या आहेत. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ ठरली आहे. कारण ४८ पैकी २१ जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, १७ जागा काँग्रेसला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १० जागा मिळाल्या आहेत.
गुढीपाडव्याला जागावाटप जाहीर
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचं जागावाटपाचं घोंगडं भिजत पडलं होतं. अखेर सगळ्या जागा जाहीर झाल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १७ जागा जाहीर केल्याने आणि सांगलीची जागा घेतल्याने काँग्रेसने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता मविआमध्ये ऑल इज वेल झाल्याचं आजच्या पत्रकार परिषदेतून दिसून येतं आहे.
२१-१७-१० चा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला
मविआने २१-१७-१० जागांचा फॉर्म्युला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक २१ जागा, काँग्रेसला १७ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १० जागा देण्यात आल्या आहेत.
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बुलढाणा, हातकणंगले, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली. यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर प्रश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई ईशान्य या जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्या आहेत.
काँग्रेसला नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर, पुणे, लातूर, सोलापूर, रामटेक, कोल्हापूर या जागा मिळाल्या आहेत.
तर राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, अहमदनगर दक्षिण, बीड या दहा जागा देण्यात आल्या आहेत.