पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
चैत्री शुध्द एकादशी 19 एप्रिल रोजी संपन्न होत असून, या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. सध्या उन्हाळा सुरु असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. भाविकांना उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी पत्राशेड व दर्शनरांगेत आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. तसेच दर्शन रांगेतील भाविकांना दशमी, व द्वादशी दिवशी तांदळाची खिचडी, एकादशी दिवशी साबुदाण्याची खिचडी त्याचबरोबर लिंबू सरबत अथवा मठ्ठा मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
याचा शुभारंभ गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, ह भ प श्री ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी, बलभीम पावले व भीमाशंकर सारवाडकर उपस्थित होते.
त्याचबरोबर यात्रा कालावधीत दर्शन रांगेतील भाविकांना थंड व शुद्ध पिण्याचे पाण्याचे वाटप करण्यात येत आहे. तसेच आरोग्य सुविधा, लाईव्ह दर्शन व्यवस्था मंदिर आदींची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मंदीर समितीमार्फत यात्रा कालावधीत दर्शन रांगेतील भाविकांना दिल्या जाणाऱ्या सोई सुविधा आवश्यकतेनुसार वाढवण्यात येत असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.