नाशिक प्रतिनिधी तेज न्यूज
उबाठा गटातील माजी मंत्री, माजी नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव घोलप आणि माजी आमदार संजय पवार यांनी आज बाळासाहेब भवन या पक्ष कार्यालयात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बबनराव घोलप हे पक्षातील जुने आणि जाणते नेते आहेत. कोणतीही मागणी न ठेवता त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ते राष्ट्रीय चर्मकार समाजाचे अध्यक्ष आहेत. समाजाला न्याय मिळवून देत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. त्यामुळेच पक्षात त्यांच्यावर राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर केले.
राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, महिला भगिनी आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचे मत व्यक्त केले. आगामी लोकसभा निवडणुकांमध्येही सरकारतर्फे केलेल्या कामांची माहिती देऊनच मते मागणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक निकाळजे गटाचे भाऊसाहेब पगारे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि वरळी विधानसभा मतदारसंघातील शंभर महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. तर एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी या पक्षाने लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला.
यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादाजी भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे उपस्थित होते.