अभिजित बापट मुख्याधिकारी सातारा नगर परिषद यांचेसह प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांची पुष्पराज राजेंद्र चौधरी आत्महत्या प्रकरणात उच्चस्तरीय सखोल चौकशी करा.-शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेची राज्य शासनाकडे मागणी
मेहतर, रूखी, वाल्मिकी समाजावरील अन्याय सहन करणार नाही. मुकेश सारवान
सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
कै.पुष्पराज राजेंद्र चौधरी हा कै.सरस्वती अंबीर चौधरी सेवानिवृत्त सफाई कामगार यांच्या नोकरीच्या रिक्त जागेवर वारसा हक्काने नियुक्तीस पात्र होता तरीही मुख्याधिकारी व आस्थापना विभाग प्रमुख सातारा नगरपरिषद यांनी जाणीवपूर्वक वारंवार डावलून नियुक्ती दिली नाही व अर्ज निकाली काढले.
२२ वर्षे सलग पाठपुरावा करूनही नोकरी मिळाली नाही या नैराश्यातून कै.पुष्पराज राजेंद्र चौधरी यांनी दि.०४/१२/२०२३ रोजी त्यांच्या राहते घरी आत्महत्या केली आहे तसेच या आत्महत्येस मुख्याधिकारी आणि आस्थापना विभाग प्रमुख जबाबदार आहेत असे आत्महत्या करणे पुर्वी लिहिलेल्या पत्रात (चिठ्ठीत) नमूद केले आहे असे आत्महत्याग्रस्ताचे वडील राजेंद्र आनंदराव चौधरी यांनी संघटनेकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना प्रणित - मेहतर, रूखी,वाल्मिकी (स्वतंत्र) विभाग, राज्य समन्वयक - मुकेश सारवान यांच्या नेतृत्वांत संघटनेने सातारा नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे सोबत बैठक घेतली.
शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेचे राज्य मुख्य सचिव सुरेश तामोत यांनी प्रशासनास जाब विचारत धारेवर धरले तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय, परिपत्रके, मार्गदर्शन पत्र यानुसार पुष्पराज चौधरी हा वारसाहक्क नियुक्तीस पात्र होता हे कागदोपत्री स्पष्ट केले.
सफाई कामगारांचे वारसांना न्याय हक्क मिळत नसल्याने जर आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलावे लागत असेल तर हे पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय व लाजिरवाणी बाब आहे अशी खंत व्यक्त करत मुख्याधिकारी,आस्थापना विभाग अधिकारी,कर्मचारी यांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास सर्व संबंधितांच्यावर शिस्तभंगाची कारवाई,ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई होऊन शासकीय सेवेतून तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
यावेळी बैठकीस शिवसेना सोशल मीडिया प्रमुख विलास बोराडे, श्रीधर पंडत,अनिल लाड, सचिन पंडत, प्रभाकर लाड, विनायक पंडत, मिलिंद पवार, राजेन्द्र चौधरी, गोपी चौधरी, संध्या चौधरी, विजय भद्रे, नितीन पंडत, अनिता चौधरी, अर्चना पंडत हे उपस्थित होते.