सोलापूर प्रतिनिधी
सोलापुरातील प्रसिद्ध जुनी मील जागेच्या घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार कुमार शंकर करजगी व त्याच्या दोन साथीदारांनी डॉ. संदीप आडके व इंजिनीयर औदुंबर आकुडे यांना मारहाण, अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सदर बजार पोलीस ठाण्यामध्ये कुमार करजगी व त्याच्या दोन साथीदारांविरोधात आज गुन्हा नोंद झालेला आहे. जुनी मिल जागेच्या दाव्या बाबत डॉ.आडके व आकुडे हे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, दादासाहेब घोडके यांच्या कार्यालयात आले असताना कुमार शंकर करजगी याने अरेरावेची व दमदाटीची भाषा वापरली. तसेच कार्यालया बाहेर जात असताना आकुडे यांची गाडी आडवून डॉ. आडके व आकुडे यांना ढकलून दिले , मारहाण केली व अश्लील शिवीगाळ करून माझ्या केस मध्ये पडू नका व तुम्हाला आज संध्याकाळी येऊन तुमच्या घरी जीवे मारू अशी कुमार करजगी व त्याच्या दोन हस्तकांनी दमदाटी केली.
जुनी मील जागेच्या १३७ एकरच्या घोटाळ्याबाबत कुमार करजगी जामिनावर बाहेर आहे व नुकतेच उच्च न्यायालयात त्याचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया जुनी मिल बेकार कामगार ,वारसदार आणि जनहित संघर्ष समिती मार्फत सुरू झालेली आहे त्याचा राग मनात धरून कुमार करजगी व त्याच्या हस्तकांनी हे कृत्य केलेले आहे. याबाबतची फिर्याद डॉक्टर आडके व आकुडे यांनी सदर बजार पोलीस स्टेशनला तात्काळ दिल्यानंतर कुमार करजगी व त्याच्या दोन हस्तकांवर गुन्हा नोंद झालेला आहे.