मंगळवेढा प्रतिनिधी
धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच धनश्री महिला पतसंस्था रौप्यमहोत्सव व धनश्री मल्टीस्टेट तपपूर्ती सोहळ्या निमित्त दामाजी रोड, मंगळवेढा येथे दि. 19 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धनश्री व सीताराम परिवाराच्या संचलिका अॅड. दिपाली काळुंगे - पाटील यांनी दिली आहे. धनश्री परिवाराची ही प्रतिष्ठेची पंचवीस वर्षे समाजकारण आणि अर्थकारणाची परंपरा बनली. ठेवीदारांचा विश्वास जपणं हीच मूल्यवान बांधिलकी समजून काम केले. सामान्यांचे संसार उभे करणारी अर्थनीती माणसांनी ठेवलेल्या विश्वासाच्या बळावरच जतन केली. गेल्या पंचवीस वर्षांतील वाटचालीचा, त्याच्या सिंहावलोकनाचा यथार्थ अभिमान म्हणून हा सोहळा साजरा होत आहे.
शुक्रवार 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता मंगळवेढा शिवार वैभव म्हणून शेतीतील सर्वोत्कृष्ठ उत्पादन पिकांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनचे उद्घाटन
उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख हस्ते तर अध्यक्ष म्हणून अॅड. नंदकुमार पवार हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी कृषी विभागातील तसेच मंगळवेढा तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 10 वा. तरुणाईचा भारत या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ पत्रकार
संजय आवटे, विजय चोरमारे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बाबुराव गायकवाड तरी अध्यक्षस्थानी प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी 4 वा. धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा. शोभाताई काळुंगे यांच्या अमृत महोत्सव सत्कार सोहळा व अमृतमहोत्सवी ग्रंथाचे प्रकाशन सोहळा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ. ह. साळुंखे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सह जिल्ह्यातील सर्व आमदार, सर्व कारखान्याचे चेअरमन, पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होणार आहेत.
तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री सद्गुरू सिताराम महाराज कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड, धनश्री व सिताराम परिवाराच्या संचालिका स्नेहल काळुंगे - मुदगल यांचेसह प्रा. शिवाजीराव काळुंगे अमृत महोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष शिवानंद पाटील व कार्यकारी समितीने केले आहे.