जिजाऊं मुळेच छत्रपती शिवराय स्वराज्य निर्मिती करू शकले.
माढा प्रतिनिधी
आईच्या कर्तृत्वातच मुलाचं भाग्य लपलेलं असतं,हिमंतवान,कर्तृत्ववान, पराक्रमी राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वराज्याची ज्योत आपल्या सुर्यासमान असणाऱ्या मुलाच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात चेतवली त्यामुळे स्वराज्याची निर्मिती होऊ शकली असे प्रतिपादन व्याख्याते निलेश देशमुख यांनी कुर्डूवाडीतील संजयमामा शिंदे विद्यालयात आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना केले.
कुर्डूवाडीतील संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालयात जिजाऊ जयंतीनिमित्त 'जिजाऊ साक्षात स्वातंत्र्यदेवता' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार टोणपे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव रोहन टोणपे उपस्थित होते. पुढे बोलताना निलेश देशमुख म्हणाले की, राष्ट्रमाता जिजाऊंना मराठी, हिंदी, फार्सी, संस्कृत, कन्नड, तेलगू, उर्दू अशा अनेक भाषा अवगत होत्या. जिजाऊंनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले आणि ते पुर्ण केले. आजच्या मुलींनीही जिजाऊंप्रमाणे मोठी स्वप्ने पाहून ती पुर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न करावेत.
अवकाश विज्ञानाच्या संशोधन क्षेत्रात, युपीएससी, एमपीएससी ,डॉक्टर, इंजिनिअर, वकील, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आपले करीअर करण्यासाठी प्रयत्नशील रहावे. आजच्या युगातील महिलांनी आपल्या मुलाचं-मुलींमध्ये मोठी स्वप्ने रूजवत ती स्वप्ने पुर्ण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.अपयश आले, संकटे आली तरी डगमगून जाऊ नये. जिजाऊंचा स्वराज्यासाठीचा कुटुंबाचा, संसारसुखाचा, सर्वस्वाचा त्याग आठवावा. जिजाऊंचा जन्म म्हणजे माहेर विदर्भातील सिंदखेडराजा,सासर वेरूळचे मराठवाड्यातील, स्वराज्य व संसाराचा विस्तार सह्याद्रीच्या कुशीत पुणे जिल्ह्यात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तर आयुष्याचा अत्युच्च आनंद राज्याभिषेक सोहळा व देह त्याग रायगडाच्या पायथ्याशी कोकणात. जिजाऊंचे कार्य व जीवन हा महाराष्ट्राचा साक्षात राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक ठेवाच आहे.
आजच्या विद्यार्थांनी, तरूणांनी शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी आपल्या गावाचा, तालुक्याचा,जिल्ह्याचा, राज्याचा विचार न करता जगाचा विचार करून आपली प्रगती करून घ्यावी असे शेवटी देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीकांत सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक रूक्मीण वाघमोडे यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक अतुल गोरे,प्रवीण टोणपे, ज्योती खरात,धोंडीराम लोंढे, निवृत्ती धोंगडे, पंडित आतकर, साधना माळी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.