पंढरपूर प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांमध्ये हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार असून, या संशोधन केंद्राच्या मसुदा समितीच्या सदस्यपदी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आणि कामगार यांच्यासाठी उभारलेला लढा, यातून उदयास आलेला शिवसेना पक्ष, आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर आणि समाजकारणावर पडलेला प्रभाव, हा कायम नव्या पिढीसाठी अभ्यासाचा आणि जिज्ञासेचा विषय राहिला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे संशोधन केंद्र सुरू केले जाणार आहे.
यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या २२ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे संशोधन केंद्राच्या मसुदा समितीबाबत निर्णय घेत, या समितीच्या अध्यक्ष व सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली. यानुसार मसुदा समितीच्या
अध्यक्षपदी सचिन मारुती गायकवाड (सोलापूर), अॅड. उषा नंदकुमार पवार (बार्शी), संजय नामदेव साळुंखे (सोलापूर), आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
मागील ४० वर्षापासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार निष्ठेने जपत आलेल्या, संभाजी शिंदे यांची सदस्यपदी निवड झाल्याने, सबंध जिल्ह्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.