पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे कामकाज पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 अन्वये चालविण्यात येते. या मधील तरतुदीनुसार मंदिर समितीचा लेखापरीक्षण अहवाल व त्यावर माननीय धर्मादाय आयुक्त यांनी दिलेल्या निदेशांचा अनुपालन अहवाल राज्याच्या विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्याची तरतूद आहे.
या तरतुदीनुसार सन 2021 ते 2022 या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल व त्याचा अनुपालन अहवाल विधानमंडळाच्या विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये दिनांक 11 डिसेंबर, 2023 रोजी पटलावर ठेवण्यात आला होता.
श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या वतीने श्रींचा प्रसाद म्हणून भाविकांना बुंदी लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो. सदरचा बुंदी लाडूप्रसाद आऊटसोर्सिंग पध्दतीने खरेदी करण्यात येत होता. याबाबत सदरचे लेखापरीक्षण अहवालामध्ये काही आक्षेप आले होते. तसेच सदरचा लाडूप्रसाद संबंधित पुरवठाधारकाकडून पुरेसा व चांगल्या गुणवत्तेचा मिळत नसल्याने, त्यांचा ठेका रद्द करून मंदिर समिती मार्फत आवश्यक कच्चा माल खरेदी करून बुंदीचा लाडूप्रसाद तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे. त्यांच्याकडून तपासणी करून घेऊन व त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात येत आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात येत असून, भाविकांना चांगल्या गुणवत्तेचा व पुरेशा प्रमाणात बुंदी लाडू प्रसादाची उपलब्ध होईल याची मंदिर समितीच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे.