पंढरपूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था ही शिक्षक सभासदांसाठी आर्थिक आधार ठरत असून भविष्यकाळात या पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन शिक्षक सभासदांना अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशी ग्वाही सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे नूतन चेअरमन रामचंद्र यादव यांनी दिली.
रोपळे गावचे सुपुत्र व शिक्षक नेते रामचंद्र यादव यांची सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पत्रकार व शिक्षक मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी यादव बोलत होते. पुढे बोलताना यादव यांनी पतसंस्थेच्या कामकाजाबाबत माहिती दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संपतराव देशमुख, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नारायण घेरडे, पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष राहुल आर्वे, संचालक विजय बंगाळे, तालुका संघाचे संघटक अंकुश ढेंबरे, पत्रकार दादासाहेब कदम, संतोष रणदिवे, चैतन्य उत्पात, विनोद पोतदार, अमोल गुरव, युवा नेते राजेंद्र फुगारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.