पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाची सुरुवात दिमाखात संपन्न झाली.सुरुवातीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर ,सदस्या शकुंतला नडगिरे सर्व कलाकार यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक जयतिर्थ मेऊंडी यांचे सुपुत्र ललित मेऊंडी आणि श्रीपाद लिंबेकर यांच्या गायनसेवेला सुरुवात केली.सुरुवातीला वारकरी सांप्रदायाचा बीजमंत्र जय जय राम कृष्ण हरी गजराने वातावरण भक्तिमय केले.
त्यानंतर रुप पाहता लोचनी,पंढरीचे भूत मोठे,सदा माझे डोळा,माझ्या देहाची पालखी, ओंकार प्रधान रुप गणेशाचे,भाग्यदा लक्ष्मी बारंम्मा, सख्या नामदेवा,तिर्थ विठ्ठल क्षेत्र आदी संतरचना गाऊन शेवटी किती आनंदु रे आणि देह जावो अथवा राहो भैरवी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत तबलसाथ प्रसाद करंबेळकर, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे, विश्वंभर जोशी,हार्मोनियम स्वानंद कुलकर्णी टाळ शिवराज पंडीत यांनी अप्रतिम साथसंगत करत पहिल्या दिवसाचे स्वरपुष्प रुक्मिणी मातेच्या चरणी गुंफले.
यावेळी पंढरपूर कलारसिकांचा उदंड प्रतिसाद पहिल्या दिवसापासून मिळत असताना पुढील सहाही दिवस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या वतीने करण्यात येत आहे.संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे कर्मचारी आदी अधिक परिश्रम घेत आहेत.