महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रामार्फत आयोजित शिबीर
जोगेश्वरी प्रतिनिधी पूनम पाटगावे
जोगेश्वरी येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय अंधेरी अंतर्गत कामगार कल्याण केंद्र - जोगेश्वरी येथे फॅन्सी बॅग प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. हे शिबीर दि. ६ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान घेण्यात आले. हे शिबीर जोगेश्वरी पूर्वीतील मजास गाव टेकडी, गुंफा रोड येथे दुपारी २ ते ५ या वेळेत घेण्यात आले.
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ नुसार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी मंडळ काम करते. अधिनियमाच्या कलम ६ ब ब नुसार कामगार, मालक, शासन अशी त्रिपक्षीय वर्गणी (MLWF - महाराष्ट्र लेबर वेल्फेअर फंड ) दर ६ महिन्यातून ( जून व डिसेंबर ) मंडळाला मिळते. या निधीतून कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या अंतर्गत राबविलेल्या या प्रशिक्षण शिबीरात साडी कव्हर, पाऊच, ट्रॅव्हलिंग बॅग, हॅन्ड पर्स, समोसा बॅग, मोठी हॅन्ड पर्स अशा प्रकारच्या विविध फॅन्सी बॅग बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण शिबिरात कमीतकमी २५ ते ३० महिला सहभागी झाल्या. महिलांच्या दुपारच्या फावल्या वेळेत या शिबिराचे आयोजन केल्यामुळे महिला वर्ग खूष दिसत होता. या शिबिरामुळे महिलांना आर्थिक उत्पन्नाचे साधन तर निर्माण झाले त्याबरोबरच आगामी दसरा, दिवाळी सणामध्ये महिला वर्गास रोजगाराचे साधन देखील निर्माण झाले.