पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
सामाजिक संस्था आणि संघटनांच्या विविध स्तुत्य उपक्रमाबाबत आपण ऐकलं असेल अनेक सामाजिक संस्था आणि संघटना आपल्या अभिनव सामाजिक उपक्रमामुळे समाजाचं लक्ष वेधून घेत असतात. पंढरीतही अनेक सामाजिक संस्था व संघटना कार्यरत आहेत. अशाच पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने गेल्या पाच वर्षांपासून अनेक वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे आपला वेगळा ठसा सामाजिक क्षेत्रात उमटवलाय. ही संस्था स्थापन करणारा तरुण निलेश पांडुरंग माने याने आपले वडील कै.पांडुरंगतात्या माने यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त पंढरीतील तृतीयपंथियांना सन्मानाने बोलाऊन त्यांचा यथोचित सत्कार करत त्यांना आपल्या मातोश्री सुरेखाताई माने यांच्या शुभहस्ते साडी, श्रीफळ, टॉवेल टोपी असा संपुर्ण कपड्यांचा आहेर केलाय.
सोलापूर जिल्ह्यात सर्वप्रथमच तृतीयपंथियांचा अशा प्रकारे सन्मान करण्यात आलाय. यावेळी उपस्थित तृतीय पंथियांनी आपले मनोगत व्यक्त करताना गहिवरल्या कंठाने निलेश माने व त्यांच्या मातोश्रींनी दिलेल्या या सन्मानाबद्दल आभार व्यक्त करताना त्यांना भरभरुन आशिर्वाद देत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. आज या सामाजिक उपक्रमासोबतच संस्थेच्या वतीने वृक्षारोपन करण्यात आले. तसेच मातोश्री सखुबाई कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींना सुग्रास भोजन दिले. यावेळी मातोश्री सुरेखाताई माने, निलेश माने, गणेश माने, दिनेश माने, उमेश जाधव, तेजस अभंग, नागेश मिसाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.