पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
दिव्यांगांसाठी असलेले विविध प्रकारचे दाखले, लाभाच्या योजनांचे फॉर्म भरणे एकाच छताखाली मिळावेत, दिव्यांग लाभार्थ्यांचा वेळ वाचावा यासाठी राज्य सरकारने " दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी " अभिमान राज्यभरात सुरुवात केली असून बुधवार दि. 20 सप्टेंबर 2023 रोजी सोलापूर येथे होणाऱ्या अभियानासाठी शहर व जिल्ह्यातील दिव्यांगांनी त्यांच्या रहिवास क्षेत्रातील ग्रामपंचायत, नगरपरिषदेमध्ये नावे नोंदविण्याचे आवाहन अभियानाचे सचिव व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खामितकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
राज्य शासनाने दिव्यांग कल्याण मंत्रालय स्वतंत्र केल्यानंतर दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या नाविण्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात केली असून आमदार बच्चू कडू या अभियानाचे अध्यक्ष आहेत. प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अध्यक्ष तर समाज कल्याण अधिकारी सचिव आहेत.
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, ग्रामपंचायती या यंत्रणांच्या सहभागातून हे अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगून खमितकर म्हणाले गावस्तरावर राहणा-या दिव्यांग बांधवांनी ग्रामसेवक यांच्याकडे, नगरपालिका, नगरपंचायतीच्या क्षेत्रात राहणा-या दिव्यांगांनी नगरपरिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्याकडे नावे नोंदवायची आहेत. दिव्यांग लाभार्थीची सोलापूरला शिबीराच्या ठिकाणी नेण्या-आणण्याची जबाबदारी ही या यंत्रणांकडे सोपविण्याचा निर्णय अभियानाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी घेतला आहे. सर्व प्रवर्गातील दिव्यांगांनी आपली नांवे नोंदवावीत, असे आवाहनही खमितकर यांनी केले आहे.