सोलापूर प्रतिनिधी
जुनी मिल बेकार कामगार, वारसदार आणि जनहित संघर्ष समिती, सोलापूर यांच्या मालकीच्या जुनी मिल कंपाऊंड, सुपर मार्केट समोर, सोलापूर या जागेत बेकायदा सुरू असलेल्या राजकमल सर्कस च्या परवानग्या तात्काळ रद्द करून ही सर्कस तेथून काढून टाकून राजकमल सर्कस व उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष कुमार शंकर करजगी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी तक्रार ट्रस्टतर्फे डॉ. संदीप आडके यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.
दिं. १२ जुलै ते २५ ऑगस्ट दरम्यान असे एकूण ४० दिवसांकरिता राजकमल सर्कस यांना कुमार करजगी ने कोणतेही अधिकार नसताना बोगस उमा सहकारी संस्थेच्या लेटरहेडवर परवानगी दिलेली आहे. कुमार करजगी व त्यांच्या कार्यकारी मंडळास जुनी मिल ट्रस्टमध्ये घोटाळा केल्यामुळे २००६ सालापासून कायमस्वरूपी काढण्यात आलेले आहे तसेच लातूर व पुणे येथील जॉईंट चॅरिटी कमिशनर व कोर्टाने यांनी जुन्या मिलच्या १३७ एकर जागेत खरेदी, विक्री, लीज असे कोणतेही व्यवहार करण्यास सक्त मनाई केलेली आहे.
कुमार करजगी सध्या जामिनावर बाहेर असून त्यांचा जामीन रद्द करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल झालेला आहे. त्यामुळे जुनी मिल ट्रस्टच्या जागेमध्ये कोणीही खरेदी, विक्री ,लीज असे व्यवहार तसेच अवैधरित्या प्रवेश करू नये अन्यथा त्यांच्यावर सुद्धा फौजदारी कारवाई केली जाईल असे आवाहन ट्रस्टतर्फे डॉ. संदीप आडके यांनी केलेले आहे.