दि.०७ जुलै २०२३ पर्यंत चालणार ही प्रक्रिया!
पंढरपूर प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता पदवी अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरी अभियांत्रिकीला फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. ६२२०) म्हणून मान्यता मिळालेली असून 'प्रथम वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि.२४ जून २०२३ पासून सुरु झाली असून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व छाननी आदी बाबी सुरू झाल्या होत्या. सुरुवातीला या प्रक्रियेला दि.०३ जून २०२३ पर्यंत मुदत होती परंतु दिलेल्या अवधीत अनेक विद्यार्थ्यांची कागदपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध झाली नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून मुदतवाढ देण्यात आली असून आता शुक्रवार दि.०७ जुलै २०२३ पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली स्वेरी अभियांत्रिकी मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अभियांत्रिकी (पदवी) महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि.२४ जून २०२३ पासून सुरू झाली होती.
या प्रक्रियेला आता मुदतवाढ मिळाली असून आता ही प्रक्रिया शुक्रवार, दि.०७ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानंतर भरलेल्या अर्जाच्या संदर्भातील कागदपत्रे व प्रमाणपत्रे यांची पडताळणी करून खात्री करणे यासाठी शनिवार, दि.०८ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून स्वेरीचा शैक्षणिक क्षेत्रातील चौफेर विकास पाहून स्वेरी अभियांत्रिकी ला प्रवेश प्रक्रिया केंद्र (एफ.सी. क्र.-६२२०) म्हणून मान्यता दिली आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे या अभावी प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
आधीच्या शेड्युल नुसार आज शेवटचा दिवस असल्यामुळे विद्यार्थी व पालकांमुळे भर पावसातही स्वेरी कॅम्पसला जत्रेचे स्वरूप आले होते. रजिस्ट्रेशनसाठी येताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत तसेच सीईटी परीक्षेसाठी रजिस्टर केलेला मोबाइल/नंबर सोबत असावा. ‘सदरची नोंदणी यशस्वीपणे आणि बिनचूकपणे केलेले विद्यार्थीच शासनाच्या कॅप राऊंडसाठी पात्र राहतील. सदर कॅप राऊंड मधून प्रवेशित विद्यार्थीच शासनाच्या वेगवेगळ्या सवलती घेण्यास पात्र राहतील. त्यामुळे ही प्रवेश नोंदणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून सर्व विद्यार्थी व पालकांनी स्वेरीत येऊन ही प्रक्रिया येथील तज्ञ शिक्षकांमार्फत पूर्ण करून घ्यावी.’ असे आवाहन प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी अधिष्ठाता प्रा.करण पाटील (९५९५९२११५४), प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.सतीश लेंडवे (९५४५५५३८७८) व प्रा. यु.एल.अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

