आमदार आपल्या दारी....
जनसेवेचे व्रत शिरावरी....
विकासाचा कारभारी.....
सामान्य जनतेच्या दरबारी.....!!
पंढरपूर प्रतिनिधी
गाव-खेड्यातील वावराच्या बांधावर राबणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या, लाखांचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाच्या व नवनिर्मितीचा झरा असणाऱ्या माय-माऊलींच्या वैयक्तिक व सार्वजनिक अडी-अडचणी तसेच समस्या यांचा ऑन द स्पॉट निपटारा करण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा लवाजमा दिमतीला घेऊन भल्या सकाळपासूनच जनतेच्या सेवाभावी कर्तव्यपूर्ततेसाठी आपला दौरा सुरु केला आहे.
सदर दौऱ्यादरम्यान आमदार समाधान आवताडे यांनी महसूल,पंचायत समिती,आरोग्य, महावितरण,शिक्षण,प्रांतकार्यालय,कृषी विभाग,पोलीस विभाग यांच्याकडील विविध प्रश्नांच्या संदर्भात जनतेचे म्हणणे ऐकून समस्यांना वाचा फोडत विविध अडचणी निकाली काढल्यामुळे माय-बाप जनता आमदार महोदय यांच्या कार्यशैलीवर जाम खुश होती.
यावेळी तालुक्यातील सामाजिक व राजकीय कार्यक्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच विविध अधिकारी, खात्यांचे प्रमुख व स्थानिक ग्रामस्थ आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


