अभिनेता संदीप पाठक यांची विशेष उपस्थिती.
पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
ईश्वर ही व्यक्ती नाही तर एक शक्ती आहे. त्यामुळेच वारकरी वारीत आत्मा आणि मनाचा शोध घेत पांडुरंगाच्या चरणी सर्वस्व अर्पण करतो. वारी ही आंतर बाह्य स्वच्छतेबरोबरच आम्हास विनम्रता शिकविते. असे विचार विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड यांनी व्यक्त केले
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत, श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने पवित्र चंद्रभागेची आरतीचा नित्य उपक्रमाचा एक भाग म्हणून आषाढ शुद्ध एकादशीच पूर्व संध्येलाभक्त पुंडलिक घाटावर अभिनेता संदीप पाठक यांच्या हस्ते चंद्रभागेची आरती संपन्न झाली. त्यावेळीते बोलत होते.
या प्रसंगी अभिनेता संदीप पाठक, डॉ. रश्मी शेटकर, सज्जनगडाचे अजित गोसावी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ह.भ.प. तुळशीराम कराड, प्रगतिशील शेतकरी काशीराम कराड ,विश्व शांती दिंडीच्या अध्यक्ष उषा विश्वानाथ कराड, प्रा. स्वाती कराड चाटे, डॉ.सुचित्रा कराड नागरे, ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगावकर, दत्तात्रय बडवे आणि प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, आज संपूर्ण जगाला याच ज्ञान पंढरीतून सुख, समाधान आणि शांतिचा मार्ग दाखविला जाणार आहे. अशावेळेस सरकार आणि वारकऱ्यानी चंद्रभागेच्या नदीच्या दोन्ही तिरावर संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाने सर्वेत्कृष्ठ घाटांची निर्मिती करावी.
संदीप पाठक म्हणाले, मस्तकी चंदनाचा टिळा, लागला पांडुरंगाचा लळा. आज जगात भारी पंढरीची, वारी या यूट्यूब च्या माध्यमातून पंढरीनगरीतील भक्तांचा उत्साह संपूर्ण जगात पोहचविण्याचे कार्य करीत आहोत. या पुढे प्रत्येक वर्षी वारी करणार आहे. वारीतील भक्तीचा उमंग आणि उत्साह पाहिल्यावर आयुष्याच्या उतरत्या वयात येथेच राहणार आहे
अजित गोसावी म्हणाले, भारतीय संस्कृती आणि वारकरी पंरापरा ही जगात सर्वेत्कृष्ट आहे. संतांनी शिकविलेल्या विनम्रतेमुळे वारकरी भगवंताच्या चरणी आले आहेत. संत नसते तर आम्ही भगवंत पाहिलेच नसते. म्हणूनच असे म्हटले जाते पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी.
डॉ. सुदाम महाराज पानेगावकर म्हणाले, या सृष्टीवर जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत भक्त पुंडलिकाचे नाव असेल. आई वडिलांच्या पुण्याईने आम्ही आज येथे पोहोचलो आहोत. तसेच, चंद्रभागेची आरती करण्याची जी संधी सर्वांना मिळाली आहे ते परम भाग्यच समजावे.
विश्व शांती केंद्र (आळंदी) चे हभप शालिग्राम महाराज खंदारे यांनी सूत्रसंचालन केले.