पंढरपूर. प्रतिनिधी
कारखान्याच्या निवडणूक प्रसंगी अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. परंतु आम्हाला खात्री होती की सभासदांचा आमच्यावर विश्वास आहे. सभासदांनी दाखविलेल्या त्या विश्वासाच्या जोरावरच आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सभासदांच्या निष्ठेचा खऱ्या अर्थाने विजयी झाला. असे प्रतिपादन सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक दिनकर कदम यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे जनहित शेतकरी संघटनेचे नेते औदुंबर गायकवाड यांच्या निवासस्थानी सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्याबद्दल दिनकर कदम यांचा तर काँग्रेसच्या माथाडी कामगार सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अशोक पाटोळे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिनकर कदम बोलत होते.
या कार्यक्रमाप्रसंगी तानाजी पवार, पोपट भोसले, नारायण कदम, अशोक गायकवाड, महादेव गायकवाड, धनंजय चव्हाण, राजाराम गायकवाड, ह भ प तांबे महाराज, भारत गायकवाड, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना दिनकर कदम म्हणाले की, या निवडणुकीमध्ये सभासदांनी जो आमच्यावर विश्वास टाकला आहे. तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये चांगल्या स्वरूपाचे कार्य करू. त्याचप्रमाणे ज्या काही चुका असतील त्या चुका पुन्हा होऊ नये म्हणून यापेक्षाही अधिक चांगले कार्य करू अशी ग्वाही दिली.
तर यावेळी औदुंबर गायकवाड यांनी सभासदांनी जो विश्वास टाकला आहे तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी संचालक मंडळाने सर्व उत्कृष्ट कामकाज करून समस्या मुक्त करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले. यावेळी अशोक पाटोळे, अशोक गायकवाड, तांबे महाराज यांनी मनोगते व्यक्त केली. तर उपस्थितांचे आभार गायकवाड यांनी मानले.