इच्छाशक्ती
आज स्वतंत्र मिळून 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत.तरी ही महाराष्ट्र आणि देशातील अनेक ग्रामपंचायतींना स्वतःच्या जागा कुठे व किती आहेत हे माहीत नाही.तसेच जागांचा वापर गावच्या विकासासाठी महत्वपूर्ण असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.ही बाब चिंताजनक आहे.कारण काय तर या ग्रामपंचायतीच्या जागेवर गावातील गाव टग्यांनी केलेली अतिक्रमणे.शिवाय ही अतिक्रमणे हटविण्याची कोणाचीही इच्छाशक्ती नाही.कारण यांना विकासाची कमी परंतु राजकारणाची तलपच जास्त आहे.
आज राज्यातील व देशातील अनेक ग्रामपंचायतींना स्वतः च्या जागाच कुठे आणि किती आहेत माहित नाही.ही खुप मोठी दुर्दैवाची बाब आहे.यदाकदाचित माहीत असेल पण त्या शोधून काढण्याची इच्छाशक्ती नको का ? अनेक एकर जमीनी स्वःताच्या नावे असून, तसेच अनेक ठिकाणी रिअल इस्टेट स्वतः च्या वा कुटुंबातील सदस्यांच्या नावे, असणाऱ्या बाहाद्दरांनी सुध्दा ग्रामपंचायतीच्या जागा ढापलेल्या आहेत.यावर आवाज कोणी आणि कधी उठवला आहे,हे कधीच बघायला मिळणार नाही.
अनेक ग्रामपंचायती करमणुकीची क्षेत्रे, गार्डन तसेच वारंवार त्यांच्या देखभालीचा खर्च दाखवून अनुदान ढापतात.परंतु प्रत्यक्षात अशी ठिकाणे कोठेही दिसून येत नाहीत.मग हा पैसा जिरतो कुठे हा संशोधनाचा विषय आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका या जगातील सर्वात अवघड निवडणूका असतात.शिवाय निवडणूक येणारे आणि पराभूत झालेले उमेदवार यांच्यात काट्याची लढाई असते.विजय बोटावर मोजता येईल येवढ्याच मतदानाने झालेला असतो.तेव्हांची परिस्थिती पाहिली तर मतदार रात्रीचा दिवस करून, एकमेकांच्या अंगावर काट्या घेऊन, वेळ पडली तर शस्त्रे उचलतो.शिवाय अंगारा,गुलाल, भंडारा यांच्या आणाभाका घेतो.मिळालेच तर चार मटणाचे रवे किंवा सरमाडी... यांच्या जिवावर हे नागोबा चार दिवस डोलतात.. स्वतः च्या अंगावर केसेस घेतात.या निवडणूका संपल्या की *गरज सरो,वैद्य मरो* अशी केविलवाणी अवस्था मतदारांची होते.निवडुकीत खुप जवळचे पै-पाहुणे यांच्या ओळखी निघतात.भाव भावकी निघते.मग ते निवडणूकीनंतर पाच वर्षे का टिकत नाही.त्याला ही हवी असते इच्छाशक्ती.
आज वित्त आयोगाच्या मार्फत ग्रामपंचायतींना प्रचंड मोठा निधी उपलब्ध होऊ लागला आहे.परंतू निवडणूकीच्या कालावधीमध्ये आम्ही किती कट्टर विरोधक आहोत असे दाखवणारे भामटे निवडणूक संपली रे संपली की, कोठुन आणि कसा चोऱ्या करून पैसा मिळवायचा याच विचारात असतात. आपल्या घरा-घरात शत्रू निर्माण करणारे हे बाहाद्दर मात्र पैसा मिळविण्यासाठी एकमेकांशी गुदगुल्या करत बसतात.आपण मात्र तुरुंगात किंवा तुरुंगाच्या आणि कोर्टाच्या वाऱ्या करत बसतो..
हे करण्यापेक्षा ग्रामपंचायत पातळीवर पक्ष पार्टी बाजूला ठेवून विकास कामांना गती देऊ इच्छितो त्यांनाच निवडणूक देणे गरजेचे आहे.
कारण अनेक कोटींचा निधी ग्रामपंचायतीचा येत आहेत.त्याचे योग्य नियोजन करून गावगाडा, आरोग्य, शिक्षण, वीज,पाणी व गावगाड्यातील गावंढळ, रानटी प्राण्यागत होणारी भांडणे संपवून विकासाची इच्छा शक्ती असणारी माणसं कुठल्याही परिस्थितीत गावाचं नेतृत्व करण्यासाठी प्रेरणा मिळवून देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. लोकांच्या पायात पाय घालून राजकारण करू पाहणाऱ्या ठोंब्याना योग्य वेळी योग्य आसमान दाखवणे गरजेचे आहे.
आज अनेक ग्रामपंचायतींनी ई- ग्रामवर दिलेली माहिती व प्रत्यक्षातील विकास कामे यात खुप मोठा फरक असलेला पाहवयास मिळत आहे.त्याचे मुख्य कारण अकार्यक्षम विरोधक... विरोधक अकार्यक्षम होण्याचे कारण खुप मोठ्या येणाऱ्या निधीवर यांना ही डल्ला मारता येतो ना ? निवडणूकीच्या कालावधीमध्ये काटेरी कुंपण बांधणारे , निवडणूका झाल्या रे झाल्या ही एकमेकांना गालीचे टाकून, गुडघ्यात पाय दुमडून,नाक जमीनीला घासून एकमेकांना नमस्कार करतात.कारण काय तर पैसा...
ग्रामपंचायतींना आज पैसा कमी नाही.शासनाच्या विविध योजना येऊ लागल्या आहेत.
*आज कमी काय आहे तर गावकुसाबाहेरील व गावकुसातील प्रामाणिक पुढारी.*
फक्त
ज्या गावात विकासाची उमेद,गाव पुढाऱ्यांचा गावाकडे बघण्याचा दृष्टीकोन, गावाला येणारा पैसा गावाच्या विकासासाठी आहे.तो माझे कुटुंब किंवा माझा घरचा बाजार चालविण्यासाठी नाही.गावांनी ठरवले तर शिवाय लोकांनी एकमेकांची टाळकी फोडून निवडून दिलेल्या टाळक्यांनी ठरवले तर सरकारचा एक पैसा न घेता उत्तम काम करू.
हे काम फक्त लोकांनी निवडणूक दिलेला स्वयंपूर्ण नेताच करू शकतो.फक्त त्याची इच्छाशक्ती सरकारी निधींच्या खोक्यात न जाता गाव विकासाच्या गाभाऱ्यात इच्छाशक्तीने प्रवेश करावा बसं...
आनंद आलदर