स्वतः प्रमाणिक राहून विद्यार्थ्यांना प्रमाणिकपणाचे धडे देणारा गणेश
गार्डी येथील शुभम लवटे यांना पाकीट परत करताना शिक्षक गणेश लटके
पंढरपूर प्रतिनिधी
कोणताही शिक्षक हा भावी पिढीचा आरसा असतो. कारण शिक्षक विद्यार्थ्यांना जे शिकवतो तेच गुण त्यांच्या भावी आयुष्याला आकार देत असतात. त्यासाठी शिक्षकाने ते गुण फक्त विद्यार्थ्यांना शिकवणेच महत्वाचे नसून आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे स्वतः आधी ते अंगीकारावे लागतात. असाच एक अवलिया शिक्षक म्हणजे बाभुळगाव ता.पंढरपूर येथील गणेश लटके होय. कारण त्यांनी प्रथम स्वतः प्रमाणिक पणा आंगीकारला असून नंतर ते विद्यार्थ्यांना प्रमाणिक पणाचे धडे देत आहेत.
शिक्षक गणेश लटके यांनी यापुर्वीही अनेक घटनांमधून आपला प्रमाणिकपणा सिध्द केला असून आज बुधवारी पुन्हा त्यांच्याकडून प्रमाणिकपणा जोपासणारी कृती घडली आहे. पंढरपूर -कुर्डूवाडी मार्गावरील बाभुळगाव परिसरामध्ये ये-जा करताना त्यांना एक पाकीट सापडले. यामध्ये काही रक्कम व मौल्यवाण कागदपत्रे होती. ते पाकीट परत करण्यासाठी शोधाशोध केली असता. त्यामध्ये बँक ऑफ बडोदा शाख पंढरपूरची बँक पासबुकची झेरॉक्स मिळाली. कोणताही विचार न करता शिक्षक लटके यांनी पंढरपूर येथे जावून बँक पासबुकच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे नाव व मोबाईल नंबर मिळवीत त्यास संपर्क केला.
पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथील युवक शुभम सुभाष लवटे यांचे ते पाकीट होते. त्यांच्याशी संपर्क होताच त्यांनी पंढरपूर येथे येवून लटके यांच्याकडून आपले पाकीट स्विकारले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव स्पष्टपणे दिसत होते. याचे कारण पैशापेक्षा त्यांची परत मिळालेली मौल्यवान कागदपत्रे हे होते. तर पुन्हा एकदा समाजातील एका व्यक्तीसाठी आपला प्रमाणिकतेचा गुण आपण जोपासत असल्याचे समाधान गणेश लटके यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. यापुर्वी देखील शिक्षक गणेश लटके यांनी अशा अनेक घटनांमध्ये मदत करून समाजाप्रती आपले असणारे कर्तव्य पार पाडले आहे. त्यामुळे यावेळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तींकडून गणेश लटके यांच्या या गुणवैशिष्ट्याचे कौतुक होत होते.
गणेश लटके यांच्या या सामाजिक कार्यासाठी त्यांना त्यांच्या आई वडीलांकडून संस्काररूपी प्रेत्साहन मिळाले आहे. तर बाभुळगाव येथील श्री रेणुका विद्यालय परिवारातील सर्वच घटकांकडून सहकार्य करण्यात येत आहे. त्यांच्या या कृतीशील अध्यापनामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक जडण घडणीवरही सकारात्मक परिणाम होत असून त्याची प्रचिती अनेक घटनांमधून विद्यार्थ्यांच्या पालकांना आल्याने शिक्षक गणेश लटके यांचे पालकामधूनही कौतुक होत आहे.
शिक्षकानेच चांगल्या गुणांचा अंगीकार केला पाहीजे......
शिक्षक म्हटल्यानंतर आपण विद्यार्थ्यांचे आयडॉल असतो. अशावेळी त्यांना फक्त उपदेश न करता आपल्या कृतीतूनही काही गोष्टींचा अनुभव दिला पाहीजे. यासाठी शिक्षकाने सर्वप्रथम चांगल्या गुणांचा अंगीकार केला पाहीजे. मगच विद्यार्थ्यांना उपदेश केला पाहीजे. खरे पाहता हे सर्व संस्कार आई वडील व बाभूळगाव येथील श्री रेणुका परिवारातील सर्वच घटकांकडून मिळत आहेत. या सर्वांच्या सहकार्यातून यापुढील काळातही सामाजिक कर्तव्य बजावण्यासाठी तत्पर राहू
गणेश लटके
शिक्षक, रेणुका विद्यालय , बाभुळगाव ता.पंढरपूर