बीड प्रतिनिधी
मराठवाड्यातील बीड या शहरातील श्री. तुळजाभवानी मंदिरात रविवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत चोरट्यांनी मोठी धाडसी चोरी केलेली आहे. या तुळजाभवानी मंदिराला खासबाग मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. शहरातील गजबजलेल्या मध्यवस्तीत असलेल्या या मंदिरात ही चोरी झाल्यामुळे पोलीस प्रशासनावर व त्यांच्या कामगिरी वरती मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड शहर व जिल्ह्यामध्ये सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असून, दरोडे, लुटमार, चोरी यांना अटकाव करणे पोलीस प्रशासनाला शक्य झालेले नाही.
बीड शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवरून फिरणाऱ्या अनेक महिलांचे मंगळसूत्र आणि दाग दागिने सर्वासपणे पळविले जात आहेत. अशातच बीडचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील चोरीच्या प्रकारात देवीच्या मूर्तीच्या अंगावरील मणि मंगळसूत्र चोरीला गेल्यामुळे भाविकांमध्ये आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चोरीचा तपास चालू केला आहे.
बीड शहराचे पोलीस निरीक्षक रवी सानप कशा पद्धतीने तपास लावणार याकडे बीड वासियांचे लक्ष लागून राहिले आहे.