मायणी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीमार्फत महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनात येथील कला, वाणिज्य महाविद्यालय मायणी कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळया फिती लावून काम केले.
आंदोलनात महाविद्यालयाचे श्री. भास्कर बुधावले, श्री. मिलिंद देशमुखे, श्री. हेमंत जाधव, श्री.राजेद्र पाटील, श्री. भगवान वायंदडे, श्री.अनुप शिंदे, श्री. संदिप हांगे सहभागी झाले होते. सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करून सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्वरत लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार दहा, वीस, तीस वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी. सातव्या वेतन आयोगातून वंचित असलेल्या 1 हजार 410 विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2016 ते प्रत्यक्ष सातवा वेतन आयोग लागू झाला त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करावी. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास मान्यता द्यावी. 2005 नंतर सेवेत रुजू कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करावी आदी मागण्यासाठी 2 फेब्रुवारीपासून हे आंदोलन केले जात आहे. त्यानुसार महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काळ्या फिती लावून काम केले. गुरुवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप व सोमवार दिनांक 20 पासून सर्व कृषी विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये बेमुदत बंद पुकारण्यात आली आहेत.