सोलापूर प्रतिनिधी
सिंहगड सोलापूर महाविद्यालयाने विविध स्तरावरील प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये अव्वल राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी देखील विद्यापीठस्तरीय अविष्कार २०२२ मध्ये सिंहगड सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक मिळवले. विद्यार्थांच्या तांत्रिक गुणांना वाव मिळावा म्हणून सोलापूर विद्यापीठ दरवर्षी विद्यापीठस्तरीय अविष्कार ही तांत्रिक स्पर्धा आयोजित करते. यामध्ये विद्यापीठा अंतर्गत असलेले सर्व अभियांत्रिकी, विज्ञान, कला, वाणिज्य, फार्मसी, कायदा आणि व्यवस्थापन इत्यादी महाविद्यालये सहभागी होतात.
यावर्षीच्या अविष्कार २०२२ मध्ये सर्व महाविद्यालयामधून ४१४ प्रकल्पांचे सादरीकरण झाले. यामध्ये सोलापूर सिंहगड महाविद्यालयातून ६ वेगवेगळ्या विभागामधून १७ प्रकल्प सादर केले. यामध्ये तृतीय वर्षातील विद्युत विभागातील कु. अपेक्षा माळी हिने सादर केलेल्या ' ईएमएफ जेनेरेटिंग स्मार्ट बेंचेस ' या प्रकल्पाला, प्युअर सायन्स या विभागामधून प्रथम पारितोषिक मिळाले.या प्रकल्पामध्ये प्रतीक्षा भोसले, रोहन काळे, ऋतिक पवार आणि संदीप भोई या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या प्रकल्पामध्ये प्रा. अविनाश लावणीस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
अपेक्षा माळी ही आता राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. यापूर्वी सिंहगड सोलापूर महाविद्यालयाने वेगवेगळ्या जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरावरील विविध प्रकल्प स्पर्धामध्ये पारितोषिक मिळवून आपला ठसा उमटवला आहे. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन, स्टार्टअप यात्रा, नवधारा -२०२२ (पीसीसीओई- पुणे), आयआयटी पवई, सिओईपी - पुणे आणि डीपेक्स अशा अनेक स्पर्धामध्ये सिंहगड सोलापूर च्या विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
विद्युत विभागाचे प्रमुख प्रा. विजय बिरादार यांचे या टीमला मार्गदर्शन लाभले.अविष्कार-२०२२ मध्ये सिंहगड सोलापूरच्या सर्व टीमचे समन्वयक मधून प्रा. सुनील शाखापुरे यांनी काम पाहिले. या यशाबद्धल सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ.रविंद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मच्याऱ्यांनी अभिनंदन केले.